नाटककाराने अहंकार बाजूला सारून नव्या प्रयोगांना सामोरे जायला हवे, मात्र तसे करताना जुन्या परंपरा विसरू नयेत, असे ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सांगितले.
गोवा कोकणी अकादमी व अंत्रुज लळितक बांदोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या कोकणी नाट्य संमेलनाच्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, संमेलनाध्यक्ष पुंडलिक नायक, स्वागताध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर, प्रतिभा मतकरी, बांदोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच नयन नाईक, कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष प्रा. भूषण भावे, केरळचे नाटककार पय्यनूर रमेश पै, संमेलनाचे कार्याध्यक्ष विजयकांत नमशीकर, रमेश पै, संमेलनाचे कार्याध्यक्ष विजयकांत नमशीकर उपस्थित होते.आपल्या भाषणात श्री. मतकरी पुढे म्हणाले की, बाकीचे साहित्य प्रकार लिहून झाल्यानंतर थांबतात तर नाटक लिहून झाल्यानंतर पुढे प्रयोगाच्या निमित्ताने चालत राहते. परंतु नाटक यशस्वी होण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या तंत्राची व आधुनिकतेची जाण असणे आवश्यक आहे. लेखकामधली अस्वस्थता कायम ठेवताना जे काही अनुभवले, अनुभवताना जे काही अंगावर आले तो अनुभव संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांना द्या आणि असे करताना परिणामावर जास्त भर द्या, असे मार्गदर्शन त्यांनी केले. संमेलनाध्यक्ष पुंडलिक नायक म्हणाले की, सर्वसामान्य प्रेक्षकांना नाटकाची कला व दर्जाबद्दल काहीच देणे घेणे नसते. परंतु संमेलनाच्या माध्यमातून दर्जात्मक व गुणात्मक नाटकावर भर देणे आवश्यक आहे. करमणूकप्रधान नाटक वाढणे आवश्यक आहे. नाटक हे समाज प्रबोधनाचे माध्यम असते. परंतु त्याचा अतिरेक झाला तर नाटकाचा प्रभाव निष्प्रभ ठरतो. उत्सवी रंगभूमी परत फुलून येणे आवश्यक आहे. कोकणी संस्कृतीचा तो अविभाज्य असा घटक आहे. गरज पडली तर उत्सवी रंगभूमीला सरकारने राजाश्रय देणे गरजेचे आहे. स्वागताध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर यांनी स्वागत केले. प्रा. भूषण भावे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन विजयकांत नमशीकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रुपा च्यारी यांनी केले.