– अन्वेषा सिंगबाळ
नोव्हेंबर १ व २ रोजी फोंडा येथील श्री गोपाळ गणपती देवस्थानाच्या सभागृहात झालेले पहिले कोंकणी नाट्य संमेलन म्हणजे एक ऐतिहासिक क्षण. एका शतकाची नाट्य परंपरा असलेल्या गोव्यात आजपर्यंत एकही नाट्यसंमेलन न होणे म्हणजे आश्चर्य. शेवटी ही कमी भरून काढून नाट्य संमेलनाची नांदी वाजली व दोन दिवसांत असंख्य नाट्य कलाकार व नाट्य रसिकांच्या हजेरीत पहिले नाट्यसंमेलन यशस्वीरित्या पार पडले. गोवा कोंकणी अकादमी व नाट्य क्षेत्रात गेली कित्येक वर्षे अप्रतिम काम करणारी फोंड्याची नाट्य संस्था अंत्रुज लळीतक, बांदोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेल्या या संमेलनाला मिळालेला अद्वितीय प्रतिसाद हे या संमेलनाचे सगळ्यात मोठे फलीत. अनेक देवदैवतांचे स्थान असलेल्या गोवा राज्याला लोककला व लोकनाट्याची परंपरा लाभली आहे. गोव्याच्या देवळांत जत्रा व कुठल्याही धार्मिक समारंभात नाटकाचा समावेश आवर्जुन होतो. या दिवसांत गांवातील मंडळी नाटकाच्या तयारीला लागतात. मोठ्या उत्साहाने व रसिकांच्या उपस्थितीत हे नाटक सादर होते. या हौशी नाट्य परंपरेच्या व्यतिरिक्त स्पर्धात्मक नाट्य मंच व निम्नव्यावसायिक नाट्य मंचही गोव्यात रुजू होत गेला आहे. गोवा कला अकादमी, संकल्प थिएटर, कुडचडे सारख्या संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धांत अनेक नाट्य संस्था दर्जेदार नाटके सादर करतात व रसिकांची वाहवा मिळवतात. असे असतानाही आजपर्यंत नाट्य संमेलनाचे बी का रुजले नाही हा सवाल फक्त लोकांच्या नव्हे तर संमेलनाचे मुख्य अतिथी ज्येष्ठ नाट्य कलाकार रत्नाकर मतकरी यांनासुद्धा पडला यात आश्चर्य कसले!
ढोल ताश्यांच्या गजरात लोकनृत्य पथक, नाट्य कलाकार व संमेलनाचे प्रतिनिधी यांच्या समवेत फर्मागुढी परिसरात काढलेल्या शोभायात्रेत मुख्य अतिथी रत्नाकर मतकरी तसेच संमेलनाध्यक्ष पुंडलिक नाईक यांचे सभागृहात आगमन झाले तेव्हा तुडूंब भरलेल्या सभागृहात बसायला जागा शिल्लक नव्हती. अशा उत्स्फूर्त प्रतिसादात व नांदीच्या मंजुळ स्वरात संमेलनाचा पडदा उघडला. संमेलनाचे उद्घाटन केल्या नंतर श्री. मतकरी बोलायला व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी सुरवातीलाच गोव्याकडे आलेल्या आपल्या संबंधाचा उल्लेख करून आपण परकी नसल्याचे भासविले. गोव्यातील नाट्य दौरे, कला अकादमीच्या रिपर्टरी कलाकारांशी आलेला संबंध व नाट्यशिक्षण शिबिरांच्या निमित्ताने घेतलेला गोव्याचा पाहुणचार याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. नाटकांची एका शतकाची परंपरा, लोकरंगभूमीचा भक्कम आधार व गेल्या पन्नास वर्षांत बदलत नाटक आत्मसात करूनही आजवर गोव्यात स्वताचे असे नाट्यसंमेलन का होत नव्हते याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गोमंतक रंगभूमीची ही उणीव यंदापासून भरून येत आहे याचा आनंद व्यक्त करताना तिच्यामुळे गोमंतकीय रंगभूमीला अधिक बळ मिळो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. नाटक म्हणजे काय असा मुलभूत प्रश्न त्यांनी या वेळी उभा केला व आपल्याला झालेली नाटकांची ओळख ते आपल्या भाषणात मांडत गेले. नाटक हा सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार आहे असे म्हणताना कथा किंवा कादंबरी यांच्याप्रमाणेच नाटक जेव्हा लिहिले जाते तेव्हा लेखकाच्या मन:चक्षुंनी प्रयोगासारखंच दिसत असतं; मात्र जिथे कथा, कादंबरी, काव्य थांबतात तिथे नाटक थांबत नाही. ते पुढे जाऊन रंगमंचावर उभं राहून प्रेक्षकाला प्रत्यक्ष दर्शन देते असा विचार श्री. मतकरी यांनी मांडला. आपल्यामधील अस्वस्थतेने कसे नवनवीन प्रयोग करण्यास भाग पाडले हे सांगताना त्यांनी कित्येक नाटकांचा उल्लेख करत उपस्थितांना नवप्रेरणा दिली. नाटकासाठी प्रामाणिकपणाची नितांत गरज आहे हे बालरंगभूमीने शिकविल्याचे त्यांनी सांगितले. मुले प्रौढांच्या इतकी पुर्वग्रहांनी जखडलेली नसतात म्हणून आम्ही मुलांच्या नाटकांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहू शकलो. बालरंगभूमीला मी माझी प्रयोगशाळा मानतो ते यामुळेच असे ते म्हणाले. आपण नाटकांत केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांची उदाहरणे देत लोकरंगभूमीची आपली परंपरा पुन्हा एकदा नवीन विषयांमुळे कशी जीवंत होईल, ती कशी कार्यरत राहील याचा विचार करावा व त्यातून नवीन नाटक घडवावं असे आवाहन त्यांनी केले. आपापसातले मतभेद विसरा. नाटक ही गोष्ट आपल्यापेक्षा फार मोठी आहे हे लक्षात घ्या आणि नव्या उत्साहाने सर्वांनी एकत्र येऊन नाटक करा असा सल्ला श्री. मतकरी यांनी दिला.
संमेलनाध्यक्ष पुंडलिक नाईक यांनी कोंकणी नाटक स्वत:ची ओळख घडविण्यास यशस्वी ठरल्याचे सांगितले. गोवेकरांच्या जिवनाची वास्तवपूर्ण प्रतिमा दाखविण्याचे बळ कोंकणी नाटकाने कमविले आहे. कोंकणी नाटकाने भाषेबरोबर विषय, पात्रे, नेपथ्यशैली व संगीतसुद्धा कोंकणीत आणले. मराठी नाटकांचे अनुकरण केले नाही. गोव्यासोबत इतर कोंकणी प्रांतातील नाट्यपरंपरेचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. नाटकाची भूक भागविण्यासाठी उथळ नाटकांचा प्रकार कोंकणीतच नव्हे तर इतर सगळ्याच भाषांनी तयार झालेला दिसत आहे. निखळ मनोरंजन व करमणूक अशी अभिरुची तयार करणारे हे नाटक. ही नाटके फक्त जत्रांच्या रात्री जागवू शकतात व आर्थिक उलाढालही करू शकतात. मात्र नाटक या साहित्य प्रकाराला ही नाटक कुठलीच उंचाई देऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले. कोंकणी नाटकाचे यश हे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व शेवटी प्रेक्षक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. कोंकणी नाटकांचे आता शतक महोत्सवी प्रयोग होतात. बहुभाषिक नाट्य महोत्सवांत कोंकणी नाटकाला स्थान आहे. महाविद्यालयीन तसेच विद्यालयीन स्थरावर कोंकणी नाटकांचा अभ्यास होत आहे. मात्र, अजूनही अनेक गोष्टी कमवायच्या असल्याची त्यांनी आठवण करून दिली. कोंकणी नाटक गोव्याची सीमा ओलांडून इतर कोंकणी बोलणार्या प्रदेशात पोचण्याची गरज व्यक्तविली. गोव्यातील नाट्यगृहांमध्ये कोंकणी नाटकांचे तिकीट प्रयोग करून नाट्यरसिकांची गर्दी खेचण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे त्यांना आवाहन केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकार यांनी हे संमेलन कोंकणी भाषेतून नाट्यनिर्मीती करून कोंकणी अस्मिताय व परंपरा पुढे नेण्यास नवे कल्पक व सर्जनशील रंगकर्मी तयार करण्याच्या दृष्टीने आधारभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
उदघाटन सत्रानंतर काही अद्वितीय असे नाट्यप्रवेश सादर झाले. कला चेतना, वळवई यांनी स्वर्गीय दिलीपकुमार नाईक यांच्या ‘मिक्सींग फिक्सींग’ या नाटकांतील नाट्यप्रवेश सादर केला. रुद्रेश्वर, पणजी या संस्थेने जयंती नाईक यांच्या ‘कुंकमादेवीची दीपमाळ’ या नाटकांतील नाट्यप्रवेश सादर केला. अंत्रुज लळीतक संस्थेने दत्ताराम बांबोळकर लिखित ‘रंगयात्री’ या नाटकांतील तर रंगसांगाती, वळवई या संस्थेने पुंडलिक नाईक यांनी लिहीलेल्या ‘शबय शबय बहुजन समाज’ या नाटकांतील नाट्यप्रवेश सादर केला. कला अकादमीच्या रंगमेळ विभागाने ‘सूड जागोर’ ह्या ‘हॅम्लेट’ नाटकाच्या कोंकणी अनुवादित नाट्यप्रवेश सादर केला. ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था, वाळपई या संस्थेने ‘एक बुटो फुल्लो’ या नाटकातील नाट्यप्रवेश सादर केला. पुंडलिक नाईक यांच्या ‘कथा अस्तुरी’ या नाटकांतील प्रवेशही या वेळी सादर झाला. ुसर्या दिवशी अनेक चर्चा व परिसंवादांनी संमेलनाला नवीन उभारी आणली. कित्येक वर्षे मनात घर करून राहिलेल्या प्रश्नांना वाचा फुटली. कोंकणीत लिहीली जाणारी नाटके आता प्रभावशाली होत आहेत हे कोंकणी नाटकाचे बलस्थान आहे असा विचार पहिल्या परिसंवादात अध्यक्ष भरत नाईक यांनी मांडला. ‘कोंकणी रंगमाची: बलस्थाने’ या विषयावर रंगलेल्या या चर्चासत्रात वसंत सावंत, अविनाश च्यारी व डॉ प्रकाश वजरीकर यांनी आपले प्रबंध सादर केले. उत्सवी कोंकणी नाटकाने अनेकांचे मतपरिवर्तन केले आहे. समाज मन तयार करण्यात नाटकांचा मोठा हात आहे असा विचार वसंत सावंत यांनी व्यक्त करून कोंकणी नाटकांना शिस्त लावण्याची गरज व्यक्तविली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर कोंकणी नाटकांत नवनवीन विषय येण्याची गरज अविनाश च्यारी यांनी व्यक्त केली. गोव्यातील कालो हा लोकनाट्य प्रकार कोंकणी नाटकाचे बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतिची विविधता व एकात्मता ही कोंकणी रंगमंचाची बलस्थाने असल्याचे डॉ. प्रकाश वजरीकर यांनी सांगितले. व्यावसायिक व स्पर्धात्मक कोंकणी नाटकांच्या प्रगतीसाठी उत्सवी रंगमंचावरील नाटकांचा दर्जा सुधारण्याची गरज ‘कोंकणी रंगमंच : आविष्कार आणि आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली. डॉ. तानाजी हळर्णकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या परिसंवादात प्रशांत म्हार्दोळकर, राजदीप नाईक व अरुण राज यांनी विचार व्यक्त केले. नाटकाच्या दर्जाप्रमाणे प्रेक्षक तयार करण्याची गरज तसेच कोंकणी नाटकाचे समीक्षक तयार करण्याची गरज डॉ. हळर्णकर यांनी या वेळी बोलताना प्रकट केली. कोंकणी कविता वा कादंबरी जिथे पोहचू शकत नाहीत तिथे कोंकणी नाटके पोचतात असे राजदीप नाईक म्हणाले. कोंकणी नाटकासाठी पूर्ण व्यावसायिक रंगमंच उभा करणे तसेच जागतिक रंगमंचावर कोंकणी नाटक पोहचवणे ही आमच्या पुढे आव्हाने आहेत असे मत प्रशांत म्हार्दोळकर यांनी व्यक्त केले. नाट्य दिग्दर्शकांनी प्रेक्षकांची मन:स्थिती ओळखणे गरजेचे आहे असे मत अरुण राज यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या तिसर्या सत्रांत डॉ. अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तांगण साकारण्यात आले. जेथे अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. कमलाकर म्हाळशी, दत्ताराम कामत बांबोळकर, सतीश गवस, पूर्णानंद च्यारी, गौरी कामत, एस. रामकृष्ण किणी तसेच गुरू बाळिगा यांनी चर्चेत सहभाग घेतला. चंद्रबाबू शेट्टी, स्नेहल जोग, सुशांत नाईक, एकनाथ नाईक या नाट्य कलाकारांनीही विचार व्यक्त केले. उत्सवी रंगमंचावर गंभीर नाटक सादर करणे शक्य आहे काय, तिथे येणार्या तांत्रिक अडचणी, स्त्री कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोण, लोकवेदाचा नाटकांत वापर अशा अनेक विषयांवर समर्पक चर्चा झाली. संमेलनाच्या समारोप सोहळ्यास मुख्य अतिथी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते नाट्य कलाकारांचा सन्मान करण्यात आला. डॉ. विनय सुर्लकर, अशोक भोसले, भरत नाईक, प्रविण बांदोडकर व सुकांती नाईक या कलाकारांना नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. दोन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात सुमारे तिनशेहून अधिक नाट्य कलाकारांनी सहभाग घेतला. नाट्यमंचावर काम करणार्या अनेक कलाकारांनी ह्या संमेलनाला वाहून घेतल्याने संमेलन यशस्वी ठरले.