गोलरक्षक रिकार्डो मोंतेनीग्रोच्या शानदार गोलरक्षणामुळे कॉस्टा रिकोने फातोर्डाच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ‘क’ गटात खेळविण्यात आलेल्या फिफा अंडर-१७ विश्चचषक फुटबॉल स्पर्धेत गिनीला २-२ असे बरोबरीत रोखत गुण विभागून घेतले.
दोन्ही संघांनी प्रारंभापासूनच आक्रमक खेळावर भर दिला होता. २६व्या मिनिटाला कॉस्टा रिकाने आपले खाते खोलले. आंद्रे गोम्सकडून मिळालेल्या अचूक पासवर येक्सी जार्क्विनने प्रतिस्पर्धी बचावपटू व गोलरक्षकाला चकवित संघाला १-० अशा आघाडीवर नेणारा हा गोल नोेंदविला. ३०व्या मिनिटाला गिनीने बरोबरी साधली. नाबी बांगौराने घेतलेल्या बायसिकल किकवरील चेंडू कॉस्टा रिकाचा गोलरक्षक मोंतेनीग्रोने थोपविण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू रिबाउंड होऊन परत आला. त्याच संधीचा लाभ उठविताना फांडजे टाउरेने जोरकस फटक्याद्वारे कॉस्टा रिकाच्या गोलपोस्टची जाळी भेदली. पहिल्या सत्रात दोन्ही संघ १ -१ असे गोलबरोबरीत राहिले.
दुसर्या सत्रात ६७व्या मिनिटाला आंद्रे गोम्सने कॉस्टा रिकाला २ -१ अशा आघाडीवर नेले. तर ८१व्या मिनिटाला बचावपटू इब्राहिम सौमाहने गिनीला २ -२ अशी बरोबरी साधून दिली.
या बरोबरीमुळे दोन्ही संघानी बाद फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत राखल्या आहेत. कॉस्टा रिकाचा पुढील सामना १३ ऑक्टोबरला इराणविरुद्ध गोव्यात फातोर्डा मैदानावर तर गिनीची लढत कोची मैदानावर जर्मनीविरुद्ध होणार आहे.