गोव्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस २० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार असल्याचे अखिल गोवा कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्ष दक्षिणेत १४ पेक्षा जास्त जागी निवडून येणार आहे, तर बार्देश मध्ये ६ व मुरगाव तालुक्यात ३ जागा जिंकून गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सहकार्याने सत्ता स्थापन करणार आहे.
मुख्यमंत्रिपदी कॉंग्रेस पक्षाचे सर्वांत जास्त अनुभवी व ज्येष्ठ सदस्य राज्याची धुरा सांभाळणार असल्याचे ते म्हणाले. देशात कॉंग्रेस पक्षाची हवा पसरू लागली असल्याने पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. मुरगाव तालुक्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत होणार असून या तालुक्यात तीन जागी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.