कॉंग्रेस सरकारनेच दिली होती म्हादईचे पाणी वळवण्यास संमती

0
101

मुख्यमंत्री पर्रीकर यांची विधानसभेत टीका
२००७ साली गोव्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्यास परवानगी दिली होती अशी माहिती काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिली. शून्य तासाला आमदारा विष्णू वाघ यांनी म्हादईचे पाणी वळवण्यासाठीचे काम कर्नाटकने चालूच ठेवले असल्याचे सभागृहाच्या नजरेस आणून दिले असता पर्रीकर यांनी वरील माहिती दिली.
यावेळी बोलताना वाघ म्हणाले की, कर्नाटकने पाणी वळवण्यासाठी खोदलेला कळसा ते मलप्रभा या दरम्यानचा कालवा बुजवून टाकावा असा आदेश लवादाने कर्नाटकला दिला होता. मात्र, असे असताना कर्नाटकने कालव्याचे काम चालूच ठेवले असल्याचे वाघ म्हणाले. यावर लक्ष ठेवण्यासाठी जी महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील अधीक्षक अभियंत्याची समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीने या प्रकरणी काय अहवाल दिलेला आहे असा प्रश्‍न यावेळी वाघ यांनी उपस्थित केला असता मांद्रेकर म्हणाले की, सदर समितीने तीन वेळा कालव्याची पाहणी केलेली असून अहवालही लवादाला सादर केलेला आहे.
यावेळी वाघ यांनी म्हादईचे हे पाणी कर्नाटकने वळवू नये यासाठी तुम्ही कोणती कारवाई करणार आहात, असे विचारले असता हस्तक्षेप करताना पर्रीकर म्हणाले की, २००७ साली राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने कर्नाटकला पाणी वळवण्यास परवानगी दिली होती. मात्र, ती मागे घेण्यात आली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. लवादाचा आदेश मोडून कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी वळवू पाहत आहे. याप्रश्‍नी कर्नाटकची दादागिरी वाढली असल्याचे दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले. यावेळी खुलासा करताना विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे म्हणाले की, आपली पत्नी ही कर्नाटकची असल्याने आपण मुख्यमंत्री असताना कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्यास परवानगी दिली होती अशी चुकीची माहिती एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती. ते वृत्त खोडसाळ व निराधार असल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.