कॉंग्रेस सरकारकाळात संरक्षण खात्याचे नुकसान : पर्रीकर

0
112
पर्रीकरांना पाहण्यासाठी पणजीत झालेली गर्दी. (छाया : हेमंत परब)

नौदल दाबोळीहून कारवारला नेणार नाही
लष्कराला अत्याधुनिक अशा शस्त्रांची गरज आहे. तसेच त्याला चांगल्या साधनसुविधांचीही गरज आहे. केंद्रात गेली १० वर्षे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार होते. त्या काळात संरक्षण खात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला. दलालीमुळे संरक्षण खात्याचे फार मोठे नुकसान झाले, असे, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पणजीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.या पार्श्‍वभूमीवर संरक्षण खात्याला संजीवनी देण्याची गरज असून ते काम मी करू शकेन, असे वाटल्यानेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रात पाचारण केले. संरक्षण मंत्री या नात्याने माझे काम हे खर्‍या अर्थाने प्रशासकीय असे आहे, राजकीय नव्हे, असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, नौदल दाबोळी येथून कारवारला हलवण्याची शक्यता त्यांनी नाकारली. पुढे बोलताना ते म्हणाले की, एका दिवसात काही जादू होऊ शकत नाही. पण नियंत्रण रेषेवर होणार्‍या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याऐवजी तो होऊच नये यासाठी काय करता येईल त्यावर आपण भर देणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला तर त्यावर नियंत्रण कसे आणावे त्याचीसुद्धा एक वेगळी पद्धत आहे. लष्कराच्या प्रशिक्षण क्षमतेतही वाढ व सुधारणा घडवून आणण्याची योजना आहे. नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार व तणाव हाताळण्यास लष्कर सक्षम असून संरक्षण मंत्र्याला त्याबाबत मोठी काळजी करावी लागत नाही. फक्त त्यासंबंधी रोज येणार्‍या माहितीवर लक्ष ठेवावे लागते.
चीनने भारतीय हद्दीत आक्रमण केल्याचे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
गरज भासेल तेव्हा सरहद्दीवर जाण्यास तयार असून आपला पूर्वेकडच्या सरहद्दीवर जाण्याचा विचार असल्याचे पर्रीकर म्हणाले. सियाचीनला योग्य प्रकारे शस्त्रांचा पुरवठा होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
गेला दोन-तीन दिवस आपण संरक्षणमंत्री या नात्याने १२-१२ तास काम केले. खात्याची तोंडओळख करून घेतली. तपशीलवार माहिती मिळवली. या खात्याचा व्याप हा प्रचंड मोठा आहे. या खात्याचा मंत्री या नात्याने माझा निर्णय घेण्याच्या क्षमतेचा कस लागणार आहे. गेल्या सरकारने सर्व प्रकारची शस्त्रे खरेदी करताना प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे जगभरातील ज्या मोजक्याच शस्त्रपुरवठा करणार्‍या कंपन्या आहेत त्याही काळ्या यादीत आलेल्या आहेत. आता काही तरी उपाय करावा लागणार आहे. नाही तर भारताला शस्त्रेच मिळू शकणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिलेला आहे. मोठी अत्याधुनिक शस्त्रे सोडून अन्य सगळी भारतातच तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल संध्याकाळी ४ वा. दाबोळी विमानतळावर आगमन झाले. तेथे दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी तेथेही मार्गदर्शन केले. नंतर कार्यकर्त्यांच्या व स्थानिक नेत्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे पणजीत आगमन झाले. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व अन्य नेते हजर होते. पर्रीकर यांनी पणजीत भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, आमदार मिकी पाशेको यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी पर्रीकर यांच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले की, त्यांनी तसेच गोव्यातील जनतेने दिलेले प्रेम व ठेवलेला विश्‍वास यामुळेच केंद्रात मंत्री म्हणून जाण्याइतके यश प्राप्त करू शकलो. पुढील दोन-तीन दिवस आपण गोव्यात आहे. अजून शासकीय बंगला सोडलेला नाही, असे ते म्हणाले.

‘तूमचा ‘भाई’ आता ‘भैया’ झाला’
पर्रीकरांचे उद्गार; दाबोळीत भव्य स्वागत
संरक्षण मंत्रालय माझ्याकडे देण्याचा निर्णय अवघ्या दीड दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला, असे सांगतानाच, ‘तुमचा ‘भाई’ आता ‘भैय्या’ झाला’ अशी मिस्किल टीप्पणीही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दाबोळी विमानतळावर जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना केली. उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील मिस्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, लक्ष्मीकांत पार्सेकर हे सक्षम मुख्यमंत्री आहेत, यापूर्वीच्या सर्व योजना चालू राहतील, शिवाय केंद्राकडून मदतही वाढविली जाईल, असे ते म्हणाले.
दोन गोमंतकीयांना एकाचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणे ही ऐतिहासिक व गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.
काल संध्याकाळी दाबोळी विमानतळावर पर्रीकरांचे भव्य स्वागत झाले. सुहासिनींनी त्यांना ओवाळले. दुपारपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी मुख्यमंत्री पार्सेकर, मंत्री दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, रमेश तवडकर, एलिना साल्ढाणा, प्रमोद सावंत, नीलेश काब्राल, आवेर्तान फुर्तादो, सुभाष फळदेसाई, सभापती राजेंद्र आर्लेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, महादेव नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
उद्या आमदारकी सोडणार
पणजी मतदारसंघाचे आमदार असलेले मनोहर पर्रीकर उद्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. तळागाळात संपर्क असलेला व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार या मतदारसंघात भाजप देईल, असे त्यांनी काल सांगितले. दरम्यान, पर्रीकर अविरोध राज्यसभेवर निवडून आले आहेत.
पर्रीकरांबरोबर भाजप नेत्यांची आज बैठक
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य नेत्यांची आज महत्वाची बैठक होऊन असून ती राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत तसेच मंत्र्यांना खाती देण्याबाबत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पाठोपाठ काल संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पुष्पगुच्छ देण्याचा मान आमदार मिकी पाशेको यांना मिळाल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा काल ऐकू येत होती. अन्य एक मंत्र्यासाठीचे जे पद रिक्त आहे त्यासाठी दोन आमदारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत अधिक काही सांगण्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नकार दिला.