गोव्याची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर कायदेशीर खाण उद्योग सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर ३ ते ६ महिन्यांत राज्यात खाण उद्योग पुन्हा सुरू करण्यात येतील असे आश्वासन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काल दिले.
कॉंग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर चिदंबरम बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप, कॉंग्रेसच्या प्रसारमाध्यम प्रभारी अलका लांबा, प्रकाश राठोड, अविनाश तावारीस, एम. के. शेख, अमरनाथ पणजीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाश्वत कायदेशीर खाण उद्योग सुरू करू शकतो. परंतु आपण समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असा त्यांनी पुनरुच्चार केला. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गोव्यात पक्षांतराचा रोग थांबला पाहिजे. पोटनिवडणुकीत पक्षांतर करणार्यांचा पराभव करण्याचे जनतेने ठरवले तरच ते शक्य आहे. लोकांनी अशा राजकारण्यांना पराभूत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
चिदंबरम म्हणाले, की गोव्यासाठी संसाधने शोधण्याची समस्या नसून, समस्या आहे ती संसाधनांच्या वाटपाची. सरकारची स्वतःची संसाधने, केंद्र सरकारच्या महसुलातील वाटा आणि केंद्र सरकारचे अनुदान असे राज्याचा अर्थसंकल्पात तीन मार्ग आहेत. निधीचा स्रोत ही कधीच समस्या नव्हती, परंतु समस्या निधी वाटपाची होती. विवेकी शक्तीने आणि विचारसरणीने निधीचे वाटप केले तर जाहीरनाम्यात ठळक केलेले सर्व मुद्दे ५ वर्षांत साध्य करता येतील, असे ते म्हणाले.
जनतेच्या सूचनांनुसार
जाहीरनामा : खलप
खलप म्हणाले की २०३५ चे व्हिजन लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा गोव्यातील जनतेच्या ५०० अनोख्या सूचना घेऊन तयार करण्यात आला आहे. आमचा विश्वास आहे की प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे व न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपचा पराभव झाला तर सर्व योजना बंद होतील, अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नका, असे आवाहन चोडणकर यांनी केले. भाजप लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे चोडणकर म्हणाले.