कॉंग्रेस सत्तेवर आल्यास गरीबांना मोफत वीज-पाणी

0
109

>> प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरोंचे आश्वासन

 

येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास राज्यातील गरीब जनतेला वीज व पाणी मोफत देण्यात येणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा येत्या १५ जानेवारीपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
सर्व घटकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, सीआयआय संघटना, छोट्या व्यापार्‍यांची संघटना, शॅकवाले, टॅक्सीवाले, बिगर सरकारी संघटन अशा सर्व घटकांशी चर्चा करून त्यांना काय हवे आहे हे जाणून घेण्यात येईल. नंतर त्यानुसार जाहीरनामा तयार करण्यात येईल, असे फालेरो यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचा जाहीरनामा हा गोवा केंद्रीत असेल. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी कुळ व मुंडकार कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे घडवून कुळ व मुंडकारांचे कसे नुकसान झाले त्याचा अभ्यास करण्यासाठी रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सदर समिती लवकरच अहवाल पक्षासमोर ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपने खाण उद्योग बंद केल्यानंतर राज्यात सुमारे लाखभर लोक बेरोजगार बनले. या लोकांना रोजगार प्राप्त करून देण्यात सरकारला अजून यश आलेले नाही. काही काळ सरकारने त्यांना आर्थिक मदत दिली. मात्र, या लोकांना भिकार्‍यांप्रमाणे सरकारकडून ती घ्यावी लागल्याची टीका फालेरो यांनी केली. भाजप सरकारने सुरू केलेल्या चांगल्या योजना चालू ठेवण्यात येतील असे ते एका प्रश्‍नावर म्हणाले. लाडली लक्ष्मी योजना कॉंग्रेसने सुरू केली होती, असा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपची गृह आधार ही योजना चांगली आहे. मात्र, सरकार एका बाजूने अशा योजना सुरू करून पैसे देते. मात्र, वीज, पाणी व अन्य बिले वाढवून सरकारने लोकांना कंगाल बनवते अशी टीकाही त्यांनी केली.