कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत येत्या विधानसभा अधिवेशनातील पक्षाच्या डावपेचांसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली, असे विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर व प्रतापसिंह राणे यांनी काल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा अधिवेशनात येणार्या प्रश्नांपैकी कोणते प्रश्न विचारावेत याबरोबरच पक्षातर्फे मांडण्यात येणार्या लक्ष्यवेधी सूचना व खासगी ठराव याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची आणखी एक बैठक होणार असल्याचेही कवळेकरनी सांगितले. पक्षाने महत्त्वाचे विविध प्रश्न विधानसभेसाठी सादर केलेले आहेत. तसेच खासगी ठराव व लक्ष्यवेधी सूचनाही मांडलेल्या आहेत. पर्रीकर सरकार सत्तेवर आले त्या घटनेला आता एक वर्ष झालेले असून काम करण्यासाठी आम्हाला आणखी वेळ हवा आहे, असे सांगून सरकार वेळ मारून नेऊ शकणार नसल्याचे कवळेकर म्हणाले. आता सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यावी लागणार आहेत. जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण केली ती सरकारकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही कवळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमच्या प्रश्नांची उत्तरे अजून आलेली नाहीत
आम्ही विधानसभेसाठी सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून आलेली नाहीत. अधिवेशनाला दोन दिवस असताना प्रश्नांची उत्तरे पाठवली जातात. ती हातात पडली की उपप्रश्नांसाठीची तयारी करता येते, असे कवळेकर यांनी नमूद केले. गोवा विधानसभा परिसरात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करणारा खासगी ठराव पक्षाच्या सर्व सोळाही आमदारांनी एकत्रितपणे पाठवला होता. हा ठराव चर्चेसाठी घेण्यात आला नसल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकृतपणे आम्हाला अजून तसे काही कळू शकलेले नाही. ह्या संबंधी सभापती प्रमोद सावंत यांना जाब विचारण्याचा निर्णय विधीमंडळ बैठकीत झाल्याचे कवळेकर म्हणाले. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर सभापतींची भेट घेऊन त्यांना पुतळ्यासंबंधीच्या ठरावाविषयी जाब विचारण्यात येईल. अधिवेशनात कोळसा प्रदूषण व नद्यांच्या राष्ट्रीकरणाचा प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे, असेही कवळेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी चिंता
काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांची प्रकृती लवकर सुधारो, अशी कामना व्यक्त करण्यात आल्याचे कवळेकर व राणे यांनी सांगितले.