कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज सोमवार दि. ६ जानेवारी होणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले.
या बैठकीत मंगळवारी होणार असलेले एक दिवसीय विधानसभा अधिवेशन तसेच पुढे होणार असलेल्या हिवाळी अधिवेशनासंबंधीची पक्षाची रणनीती ठरवण्यात येणार आहे.
आजच्या विधिमंडळ बैठकीत म्हादई प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोवा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याची जी आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे त्याबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
दरम्यान, उद्या होणार असलेल्या गोवा विधानसभेच्या एक दिवशीय अधिवेशनात गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व आमदार विजय सरदेसाई हे म्हादई प्रश्नी जो स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत त्याला कॉंग्रेस पक्ष पाठिंबा देणार आहे काय, असे कामत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्याबाबत कोणती भूमिका घ्यायची त्याचा निर्णयही आजच्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष बैठकीत घेण्यात येईल.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना स्थगन प्रस्तावासंबंधी विचारले असता त्यांनी, हा स्थगन प्रस्ताव कॉंग्रेस पक्षानेच आणायला हवा होता. विजय सरदेसाई यांनी हा स्थगन प्रस्ताव आणल्यास त्याला कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा, असे आपले वैयक्तिक मत व्यक्त केले.