कॉंग्रेस आणि भाजप या पक्षात कोणताही फरक नसून हे पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे पत्रकार परिषदेत बोलताना आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी सांगितले. गोव्यातील जनतेने मोठ्या अपेक्षेने मनोहर पर्रीकर यांचे सरकार सत्तेवर आणले होते. मात्र, या सरकारने गोव्यातील जनतेची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. मनोहर पर्रीकर सरकार भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईल अशी जनतेची अपेक्षा होती. पण त्याबाबत जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे गुप्ता म्हणाले. खाण व्यवसाय, प्रादेशिक आराखडा, लोकायुक्त, कॅसिनो, माहिती हक्क कायदा याबाबतही सरकारने यू टर्न घेतले आहे, असे ते म्हणाले. केवळ आम आदमी पार्टीच लोकांचे प्रश्न सोडवू शकते असे दिसून आल्याने जास्तीत जास्त लोक आता आम आदमी पार्टीत प्रवेश करू लागले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. आम आदमी पार्टीने दिल्लीत दिलेले भ्रष्टाचार मुक्त प्रशासन जनतेने अनुभवलेले असून त्यामुळे लोक आम आदमी पार्टीकडे आकृष्ट होऊ लागले असल्याचे पंकज गुप्ता यांनी स्पष्ट केले.