>> अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय; शशी थरुर यांचा पराभव; पक्षाला उभारी देण्याचे मोठे आव्हान
देशातील सर्वांत जुन्या कॉंग्रेस पक्षाला तब्बल २४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव करत कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी ९ हजार ८०० जणांनी मतदान केले होते. त्यापैकी खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली, तर शशी थरुर यांना १०७२ हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या २४ वर्षांमध्ये प्रथमच झालेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी ९६ टक्के मतदान झाले होते. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होती. त्यानंतर काल मतमोजणीनंतर कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण, हे स्पष्ट झाले.
निकालानंतर कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. खर्गे समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजय साजरा केला. विजयानंतर सचिन पायलट, गौरव गोगोई, तारिक अन्वर आदी नेत्यांनी खर्गे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
१९६९ मध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची लोकप्रियता पाहून पक्षाने त्यांना गुलबर्गा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष केले. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. या मतदारसंघातून ते नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले. या कालखंडात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपदही भूषवले. २००५ मध्ये त्यांना कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसची जबाबदारी मिळाली होती. २००८ पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
खर्गे हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मानले जातात. २०१४ मध्ये खर्गे लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले. २०१९ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसने त्यांना २०२० मध्ये राज्यसभेवर पाठवले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला, तेव्हा खर्गे यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
कॉंग्रेसमध्ये चैतन्य आणण्याचे आव्हान
कॉंग्रेस १३७ वर्षांच्या इतिहासात सर्वांत वाईट कालखंडातून जात आहे. पक्षासमोर २०२४ च्या निवडणुकीसाठी तगडे आव्हान आहे. कॉंग्रेसमध्ये नव्याने जाण फुंकण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पदभ्रमंती करत आहेत. या यात्रेने १ हजार किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता तोच प्रतिसा २०२४ पर्यंत कायम ठेवण्याचे तगडे आव्हान खर्गे यांच्यासमोर असेल.
आज महागाई गगनाला भिडली आहे. सरकारकडून देशात द्वेष पसरवला जात आहे. आपण कॉंग्रेसचा एक सैनिक म्हणून काम करत राहणार आहे. कॉंग्रेसमध्ये सर्व समान आहेत. आपण सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करायला हवे, पक्षात कोणीही लहान-मोठा नसतो. लोकशाही संस्थांवर हल्ला करणार्या शक्तींविरुद्ध आपल्याला एकजुटीने लढायचे आहे.
- मल्लिकार्जुन खर्गे,
अध्यक्ष, कॉंग्रेस.
ॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनणे ही एक मोठी सन्मानाची बाब आहे. पण त्यासोबतच ती एक मोठी जबाबदारीही आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांना आपण शुभेच्छा देतो. तसेच आपणास मत देणार्या एक हजाराहून अधिक कॉंग्रेसजनांचे आपण आभार मानतो.
- शशी थरुर, पराभूत उमेदवार.