केंद्र सरकारने गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणारा एक ठराव गोवा सरकारने येत्या विधानसभा अधिवेशनात संमत करावा, अशी मागणी कॉंग्रेस पक्ष उद्यापासून सुरू होणार्या विधानसभा अधिवेशनात करणार असल्याचे विरोध पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर आम्ही गोव्यातील नद्यांच्या राष्ट्रीकरणाच्या प्रश्नावर विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना मांडणार असून त्यावर किमान अर्धा तास चर्चा व्हावी, अशी मागणीही करणार असल्याचे कवळेकर यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर बोलत होते.
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत गोव्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला येत्या विधानसभा अधिवेशनात जोरदार विरोध करण्याचे ठरल्याचे कवळेकर यांनी सांगितले.
गोवा अगदीच छोटे राज्य असून गोव्यात मुळातच जमीन कमी आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण झाल्यास गोव्याचे फार मोठे नुकसान होईल असे पक्षाचे म्हणणे आहे. केरळ राज्यानेही आपल्या ११ नद्यांचे राष्ट्रीयीकरण मागे घ्यावे, अशी मागणी केलेली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यसभा खासदार असताना आपण नद्यांच्या राष्ट्रीकरणाला विरोध केला होता असे यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक म्हणाले. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या काल झालेल्या बैठकीला पक्षाच्या १६ आमदारांपैकी ११ आमदार उपस्थित होते. पाच आमदार राज्याबाहेर असल्याने ते बैठकीला हजर राहू शकले नाहीत, असे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यानी सांगितले.