– रमेश सावईकर
कॉंग्रेस पक्षाची गोवा राज्यातील राजकीय अवस्था आणखी खालावत चालली आहे. त्याला फक्त राज्यातील कॉंग्रेस नेतेच जबाबदार नसून पक्षश्रेष्ठीही तितक्याच कारणीभूत आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात पक्षातील अंतर्गत मतभेद, हेवेदावे, आत्मकेंद्रिय राजकीय स्वार्थ-नीति आदी सगळ्याच बाबींना तोंड फुटले. ज्येष्ठ नेत्यांनी कित्येक वर्षे पक्षासाठी काम करूनही त्यांना डावलण्यात आले. त्याचा अपेक्षित परिणाम अखेर लोकसभा निवडणुकीवर होऊन दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेस पक्षाला गमवावी लागली. अर्थात राज्यात नव्याने उसळी घेऊन आलेली ‘मोदी लाट’ ही जनमतावर परिणाम साधणारी ठरली हे देखील सत्य आहे. राज्यांत भारतीय जनता पक्षाचे बस्तान लोकसभा निवडणुकापासूनच घट्ट मूळ धरू लागले. कॉंग्रेस पक्षाला नामुश्की पत्करावी लागली. पक्षामध्ये बंडखोरी झाल्याने हे घडले असा ग्रह करून पक्षश्रेष्ठींनी गोवा प्रदेश समितीचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला. राज्यात ज्येष्ठ कॉंग्रेस नेते होते, त्यांचा विचार न करता आपल्या मर्जीतील जॉन फर्नांडिस यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घालून श्रेष्ठी मोकळ्या झाल्या. त्यांच्या या नियुक्तीवर राज्यातील कॉंग्रेस नेतेमंडळी नाखूश होऊन विरोधाला वाचा फुटली.
जॉन फर्नांडिस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षविरोधी कार्यकर्ते नि नेत्यांवर कारवाई करण्याचा विडा उचलला. मुळातच गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेस पक्ष राज्यात कमकुवत होत चालला असताना या ना त्या कारणाचा ठपका ठेऊन असलेल्यांना दूर लोटायचे ही कृती तारक नव्हे तर मारकच ठरली आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांचा आपणाला पाठिंबा आहे असे वातावरण निर्माण करून जॉन फर्नांडिस किती काळ या पदाला चिकटून बसणार? फर्नांडिस यांच्या विरोधात राज्यातील आजी-माजी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करून त्यांना हटविण्याची मागणी केली. ती मागणी तत्त्वतः मान्य झालेलीच आहे. आता फक्त श्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षांचे नाव घोषित होणे बाकी आहे. जॉन फर्नांडिस यांनी मतदारसंघातील कॉंग्रेस गट समित्या बरखास्त केल्या. प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपणाला अधिकार आहे त्याचा वापर आपण केला असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे. पक्षाची सदस्यसंख्या वाढवून पक्षाला मजबूती आणण्याचे काम त्यांनी अगोदर हाती घ्यावयास हवे होते. पक्षात ‘साफसफाई’ नंतर करता आली असती.
घराणेशाहीचा शिक्का मारून ती संपुष्टात आणण्यासाठी अधिकाराचा आसूड वापरणे कॉंग्रेस बळकटीला बाधा आणणारे आहे. दक्षिण गोव्याची स्थिती तशी आहे. चर्चिल आलेमाव व त्यांचे कुटुंब, फ्रान्सिस सार्दिन, लुईझिन फालेरो यांच्या मागे पक्षाचे कार्यकर्ते व मतदारही आहेत. यावेळी ‘मोदी’ जादुईमुळे वेगळे वातावरण बघायला मिळाले. तरी दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला पुनश्च पाळेमुळे घट्ट करून उभे राहण्यास भरपूर वाव आहे. सूडाचे राजकारण करणार्यांकडे पक्षनेतृत्व गेले तर मात्र कॉंग्रेसला धोक्याची घंटा वाजली म्हणून समजायचे.
उत्तर-पूर्व राज्यातील पक्षाची जबाबदारी सध्या लुईझिन फालेरो यांच्यावर आहे. नवे गोवा प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाचा विचार पक्षश्रेष्ठींनी चालविला आहे. आपण हा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. मात्र श्रेष्ठी देतील ती जबाबदारी आपण स्वीकारीन असे फालेरोंनी म्हटले आहे. यावरून गोवा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी श्रेष्ठींनी दिल्यास ते झिडकारून टाकणार नाहीत असेच सूचित होते.
राज्यात विरोधी कॉंग्रेस पक्षाकडे सशक्तपणे विरोध करण्याची ताकद दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते राज्यांतील अनेक ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्याचे टाळीत असावेत. मात्र हल्लीच संपलेल्या राज्य विधानसभा अधिवेशनात त्यांनी सरकारला बरेच धारेवर धरले. राज्यांतील जनतेच्या अनेक समस्या आहेत. राज्याचे विविध प्रश्न आहेत, सरकारची शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन आदींविषयक जी धोरणे आहेत ती पूर्णपणे राज्याला तारक नाहीत. या बाबींवर विरोधी पक्षाने रान पेटवायला हवे. पण तसे घडत नाही. आपल्या संस्कृतीला मारक असे पर्यटन धोरण राबविण्यासाठी सरकारने पावले उचलली तर म.गो. पक्षाचे मंत्री उघडपणे भाष्य करतात. आपली विधाने मागे घेत नाही. भाजपा सरकारमनध्ये राहून हे आमदार असे धाडस करू शकतात तर विरोधी कॉंग्रेस पक्षाचे आमदार विरोधाची भूमिका प्रभावीपणे का बजावू शकत नाही?
पाच अपक्ष आमदारांनी गेले राज्य अधिवेशन गाजविले. अनेक प्रश्नांवर सरकारवर टीकेची तोफ डागली. केवळ ‘आपले तेच खरे’ असे म्हणणार्या पर्रीकर सरकारला या अपक्ष आमदारांनी खडबडून जागे केले. विरोधी कॉंग्रेस पक्ष ही भूमिका घेऊन राज्यात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून जनतेसमोर कां येऊ शकत नाही असा जनमानसाला प्रश्न पडल्यास नवल नाही!
सध्या राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे तारू भरकटत चालले आहे. जॉन फर्नांडिस यांना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदावरून हटविले जाणार आहे हे नक्कीच. पण पक्षश्रेष्ठी अजून नव्या प्रदेशाध्यक्षांचे नाव जाहीर करण्यास वेळ काढून पक्ष कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सर्वमान्य असे पक्ष नेतृत्व लाभले तरच पक्ष-संघटना बांधणीचे काम सोपे होईल. सदस्यनोंदणीची मोहीम प्रभावी कशी होईल यावर विचार व्हावा. पक्षाची शक्ती वाढविल्याशिवाय पक्षात असलेल्यांना बडतर्फ करणे, समित्या बरखास्त करून मोकळे होण्यात काहीच विधायक असे जाणवत नाही.
कॉंग्रेस पक्षातील विद्यमान आमदारांनीही पक्ष बांधणीचे काम एक आव्हान म्हणून स्वीकारायला हवे. आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्याचे राजकीय चित्र बदलून दाखविण्याचे आव्हान कॉंग्रेस पक्षाकडे आहे ते स्वीकारून विधायक दृष्टीकोनातून मार्गक्रमण केले तर अजूनही कॉंग्रेस पक्ष गतवैभव प्राप्त करू शकेल. आपले पद राखण्यापुरताच मर्यादित स्वार्थी विचार करण्याचे धोरण कॉंग्रेसमधील नेते मंडळींनी ठेवले तर नाखूश, नाराज झालेले पक्षाचे कार्यकर्ते सत्ताधारी भाजपाकडे आकृष्ट होतील नि भाजपाची शक्ती आणखी वाढेल, ही बाब कॉंग्रेस पक्षनेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे.
जॉन फर्नांडिस यांना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पाणउतार करून नवे प्रदेशाध्यक्ष विनाविलंब नियुक्त करण्याचे काम पक्षश्रेष्ठींनी करावे. राहूल गांधींचे नाव पुढे करून फर्नांडिस आपली पकड घट्ट करू बघत आहेत. वास्तविक राहूल गांधी राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले असा त्यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. युवा मतदारांना कॉंग्रेस पक्षाकडे आकृष्ट करण्यात ते अपयशी ठरले तेथे गोव्यात जॉन फर्नांडिसकडे कायम नेतृत्व सोपवून काय साध्य होणार?
जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्यांना पक्षाकडे ओढून घेण्याची नेतृत्वकुशलता असणार्या ज्येष्ठ व्यक्तीकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्यायला हवी. कॉंग्रेस पक्ष संपला, आता काही सत्तेवर येण्याची धडगत नाही अशा अविर्भावात नेतेमंडळी निराश बनून वावरू लागली तर पक्ष कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघायचे? असा प्रश्न सध्या गोव्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षश्रेष्ठींनी गोवा राज्यातील पक्षाची सद्य व सत्य परिस्थिती जाणून घेऊन वेळीच पुढील कृतीसाठी पाऊल उचलावे, अन्यथा मोदी लाटेत असले-नसलेले पक्ष कार्यकर्ते प्रवाहपतित होऊन जातील नि पक्ष आणखी शक्तिहीन बनेल यात कोणताही संदेह नाही!