आज प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार
नवनियुक्त प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो आज सकाळी येथील कॉंग्रेस भवनममध्ये पदाचा ताबा घेणार असल्याने कॉंग्रेस वर्तुळात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.फालेरो यांनी पक्षाला संजीवनी प्राप्त करून देण्यासाठीचा आराखडाही तयार केला असून मावळते प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पक्षातून हकालपट्टी केलेल्या तसेच पक्षापासून दूर ठेवलेल्या लोकांशीही फालेरो यांनी संपर्क केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्ष नेत्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पक्ष संघटना बांधण्याच्या कामांपासूनही बहुतेक नेते अलिप्त राहिले होते. सदर नेते, कार्यकर्त्यांनी फालेरो यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी सक्रीय होण्याचे ठरविले आहे, असे कॉंग्रेस भवनातील सूत्रांनी सांगितले.