कॉंग्रेसला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी

0
97

पणजी (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे एक याचिका काल सादर केली आहे. कॉंग्रेस पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी दिल्याशिवाय विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतला जाऊ नये. यासाठी गोव्याच्या राज्यपालांना आवश्यक सूचना, मार्गदर्शन करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
पर्रीकर यांच्या आजारपणामुळे भाजप आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. या परिस्थितीत भाजपकडून विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. विधानसभेत कॉंग्रेसकडे १६ आमदार आहेत आणि हा पक्ष विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास बहुमत सिद्ध करू, असा दावा चोडणकर यांनी केला आहे.
कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांना सरकार स्थापनेची संधी देण्याबाबत पत्र सादर केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींकडून गोव्याच्या राज्यपालांना योग्य तो सल्ला देण्यात यावा. राष्ट्रपतींनी गोव्यातील राजकीय परिस्थितीकडे बारीक लक्ष ठेवावे, अशी विनंती याचिकेत केली आहे.
कॉंग्रेस पक्षाने यापूर्वी राजधानी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय पातळीवर गोव्यातील राजकीय स्थितीबाबत माहिती जाहीर केली होती.