कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी चिंतन शिबिर

0
95

प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची माहिती
कॉंग्रेस पक्षाला राज्यात नवसंजीवनी, नववैभव प्राप्त करून देणे, पक्ष पुनरुज्जीवीत करणे, गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव का झाला व कॉंग्रेस पक्षाकडून राज्यातील जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याबरोबरच नव्या दमाचे तरुण नेतृत्व निर्माण करण्यासाठी नेमके काय करावे लागेल हे समजून घेण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेसने दोन दिवसांचे चिंतन शिबिर आयोजित केल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल चिंतन शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.या शिबिरानिमित्त राज्यातील ज्येष्ठ व कनिष्ठ कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते एकत्र येणार असून एका प्रकारे ते त्यांच्यासाठी एक आत्मपरीक्षणच असेल. कॉंग्रेस पक्षाचा राज्यात का पराभव झाला हा यावेळी चर्चेचा मुख्य विषय असेल. तसेच पुढे काय त्याची दिशा ठरवण्यासंबंधीही सविस्तर चर्चा होईल, असे फालेरो यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षाकडून लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, पक्षाने राज्यात नेमके काय केले पाहिजे असे त्यांना वाटते हे या चिंतन शिबिरातून जाणून घेण्यात येणार असून त्यानुसार पुढील दिशा ठरवण्यात येईल. गोव्यातील ६५ टक्के जनता ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची असून या पार्श्‍वभूमीवर नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाला पक्षात स्थान देण्यासाठी काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा चिंतन शिबिरातून होणार असल्याचे श्री. फालेरो यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाला नवे व तरुण नेते मिळावेत यासाठी हुशार व तडफदार अशा नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काय करता येईल हाही चिंतन शिबिरात चर्चेचा एक मुख्य विषय असणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपकडून अपेक्षाभंग
राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. स्वतः आपणालाही हा पक्ष काही तरी चांगले करील असे वाटले होते. पण या पक्षाने गोमंतकीय जनतेचा पूर्णपणे अपेक्षाभंग केल्याचा आरोप फालेरो यांनी यावेळी केला. माहिती आयुक्त, लोकायुक्त यांची स्थापना भाजप सरकारला करता आलेली नाही. प्रादेशिक आराखडाही पक्षाने अडवून ठेवल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस सत्तेवर असताना राज्यात उद्योग यायचे. आता ते येत तर नाहीतच; शिवाय असलेलेही पळून जाऊ लागले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्य पर्यटनातही मागे पडू लागले आहे. राज्याची आर्थिक स्थितीही कमकुवत आहे. नोकर्‍या मिळत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, असे सांगून या सगळ्या समस्यांबाबतही चिंतन शिबिरात चर्चा करण्यात येणार असून त्याविषयीची पक्षाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खाण उद्योगासाठी पक्ष कृती योजना तयार करणार असून एक खाणीसाठीचा एक कक्षही पक्ष स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले. खाण उद्योग बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेल्या ८० हजार लोकांचे जीवन अंधकारमय झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराला बाबुश मोन्सेर्रात अनुपस्थित
कॉंग्रेसचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर कालपासून सुरू झाले. दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये सुरू झालेल्या या शिबिराचे काल सकाळी १० वाजता कॉंग्रेसचे गोवा प्रभारी येल्लाकुमार व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र, पक्षाचे सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी या शिबिरापासून दूर राहणेच पसंत केले.
उद्घाटनानंतर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे व खासदार शांताराम नाईक यांची पक्षजनांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. तसेच काल पहिल्या दिवशी प्रभाकर तिंबले यांनी ‘सद्य:स्थिती व कॉंग्रेस पक्षापुढील पर्याय’, प्रकाश देसाई यांनी ‘भारतीय राजघटना, कॉंग्रेस विचारप्रणाली यांच्यातील संबंध’, राजीव साहू यांचे ‘माध्यमे व त्यांची ताकद’, क्लियोफात कुतिन्हो यांनी ‘सध्याची राजकीय स्थिती ः आव्हाने आणि पुढाल वाटचाल’, गिरीश चोडणकर यांनी ‘राज्यात पक्षाबरोबरच प्रमुख संघटनांचे एकत्रिकरण व सशक्तीकरण’ या विषयांवर मार्गदर्शन केले. पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या चिंतन शिबिरात सहभागी झाले आहेत.