– गंगाराम म्हांबरे
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल पाहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेप्रमाणे देश आता ‘कॉंग्रेसमुक्त’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. देशात प्रबळ विरोधी पक्ष नसणे हे खरे तर लोकशाहीच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.
कॉंग्रेस पक्षाचा विचार करता, त्या पक्षाचे अस्तित्व टिकणार की नाही, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. शंभरी ओलांडलेल्या एखादा पक्षाबद्दल अशी चर्चा होणे हीच नामुष्कीची बाब मानावी लागेल. देशव्यापीच नव्हे तर, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा करणारा हा पक्ष देशाच्या दोन मोठ्या राज्यांतच सत्तेवर राहिला आहे. आसाम व कर्नाटकमध्ये या पक्षाची सत्ता आहे. अन्य राज्ये छोटी व नगण्य आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रात सत्तेवर राहिलेल्या या पक्षाची स्थिती एवढी दारूण का झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळही आता निघून गेली आहे. खरे तर पराभवाचे विश्लेषण करून, तातडीने पावले उचलण्यासाठी कॉंग्रेसने समिती नेमली होती, पण तो अहवालही धूळ खात पडला आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची कार्यपद्धत या पक्षाच्या मुळावरच आली आहे. आपल्याच पक्षनेत्यांना हे पदाधिकारी सहजपणे भेटत नाहीत, तेथे पक्षबांधणीचा मुद्दाच येतो कुठे?
गोव्यात जी कॉंग्रेसची अवस्था आहे, तीच देशात बनली आहे. कोणताही नेता स्वतः पुढाकार घेण्याच्या मनःस्थितीत नाही. गोव्यातील लज्जास्पद पराभवानंतर कॉंग्रेस नेत्यांनी लगेच धाव घेऊन स्थानिक नेत्यांशी सल्लामसलत करायला हवी होती. पराभवाची कारणे शोधून, आवश्यक बदल करायला हवे होते. त्यासाठी जर दोन वर्षे लागतात, तर मग लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून सावरायला किती कालावधी लागेल?
पक्षबांधणीचा अभाव आणि भ्रष्टाचाराचे मानगुटीवर बसलेले भूत यामुळे जनमानसात घसरलेली पत हीच या पक्षाच्या पराभवाची कारणे आहेत. सत्ताभ्रष्ट झाल्यावर लाभ मिळणार नसल्याने पक्षाकडे दुर्लक्षच करण्याची नेतृत्त्वाची मानसिकता गोव्याबाबत दिसून आली होतीच. देशाची सत्ता जाताच, अशाच पद्धतीने पक्ष व नेत्यांकडे पाहिले गेले. मोदी लाट कुठे आहे? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र व हरियाणात हा पक्ष जनतेला सामोरे गेला. त्याचा परिणाम काय झाला ते दिसतेच आहे.
जनतेला सांगण्यासारखे आपल्याकडे काय आहे, कोणत्या उपलब्धी आपण सांगणार आहोत, याचा विचार न करता मोदी कसे स्वप्ने रंगवित जनतेला फसवित आहेत, हे सांगण्यातच कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपला वेळ वाया घालवला. जनतेने कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता पाहिली होती, अनुभवली होती. मोदींची वाटचाल जनता पाहात होती. नवे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन जनतेने जो कौल दिला, तो कॉंग्रेस पक्षाची घसरण स्पष्ट करणारा आहे.
आम्ही जनतेचा कौल मान्य करतो, असे आता कॉंग्रेस नेते सांगत आहेत. तसे करणे त्यांना भागच आहे. तो नाकारता न येणारा कौल आहे. मात्र पक्षाच्या पराभवाची कारणे शोधून काही बदल करणार आहात का, हाच खरा प्रश्न आहे. हरियाणात भाजपची संख्या ४ वरून ४७ वर गेली, महाराष्ट्रात भाजपचे ४६ वरून १२२ झाले, तरी मोदी लाट ओसरत चालली आहे, असा निष्कर्ष काढणारे नेते आपला पक्ष कसा सावरतील तेच समजत नाही!
ज्या पक्षाने विरोधी पक्षाची अवहेलना केली, अथवा कमी लेखले, त्या आत्ममग्न नेत्यांच्या पक्षाला यश कसे मिळू शकेल? भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही म्हणजेच एकाचवेळी १०० जागा वाढवत आल्या नाहीत, याबद्दल समाधान मानणारे नेते आपल्या पक्षाच्या स्थितीबद्दल आत्मपरीक्षण का करीत नाहीत? अशा वेळी ज्येष्ठ नेत्यांची बैठकही होत नाही, याचा अर्थ जनतेने काय काढायचा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही मोहीम सुरू केल्यानंतर, शशी थरूरसारख्या कॉंग्रेस नेत्याने त्याचे कौतुक करताच कॉंग्रेस नेतृत्त्वाचा जळफळाट झाला. तो उघडपणे व्यक्तही झाला. त्यांचे प्रवक्तेपद काढून घेण्यात आले. आणखी एका घटनेत, मध्य प्रदेशातील गुल्फ्रान आझम या नेत्याने सोनिया आणि राहुल यांच्या बुद्ध्यांकाबद्दल शंका व्यक्त करताच, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
आझम हे राज्यसभेचे आणि त्यापूर्वी लोकसभेचे सदस्य होते. त्यांची एवढी हेटाळणी केली जावी? गोव्यात तर उत्साहाने काम करणारे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनाही याचा फटका बसला आहे. अशा पद्धतीने स्वतः एकाधिकारशाहीचे दर्शन घडवत, गांधी घराणेच कॉंग्रेसला रसातळाला घेऊन जाईल, असे संकेत मिळत आहेत. कॉंग्रेस पक्षाची एकंदरित वाटचाल त्याच दिशेने होत असल्याचे दिसते. दोन राज्यांतील पराभवानंतर आता ‘प्रियंका लाव, कॉंग्रेस बचाव’चे नारे दिले जात आहेत.
कणखर नेतृत्त्व नसल्याने कॉंग्रेसची झालेली आजची अवस्था पाहाता, देश भविष्यात कॉंग्रेसमुक्त होईल असे दिसते. खरे तर आता सर्व गांधींनी बाजूला राहात केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावायला हवी. पक्षाचा कारभार दुसर्या नेत्यांच्या हातात सोपवायला हवा. केवळ चेहरेच बदलून चालणार नाही, तर त्यांना नव्या पद्धतीने काम करण्याची मुभा मिळायला हवी. भाजपने जुन्या नेत्यांना बाजूला केले, त्यांचा अवमान केला असे म्हणणारे नेते आपल्या पक्षात असा काही मोठा बदल स्वीकारतील असे वाटत नाही. पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली तरी ते उचलले जात नाही, याचा अर्थ काय?
सध्या कॉंग्रेस पक्ष केवळ केंद्रातील भाजप सरकार काही चुका करेल व आपण त्याचा लाभ घेऊ, या एकाच विचाराने पछाडला आहे. त्याऐवजी देशातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी कोणता कार्यक्रम आखता येईल, याचा विचार का केला जात नाही? महात्मा गांधी, पं. नेहरू, वल्लभभाई पटेल आदी नेते आता केंद्र सरकारच्या प्राधान्य यादीत आहेत. ‘आपले’ नेते गमावलेला कॉंग्रेस पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहे. आता लवकरच झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांतही कॉंग्रेसची स्थिती चांगली नाही, त्यामुळे पुन्हा उसळी घेऊ असे म्हणणारे नेते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा करीत निष्क्रियपणे आपली घसरण पाहात राहतील, असे दिसते.