कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेतेपद अन् प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरस

0
23

>> पद एक, दावेदार अनेक; कॉंग्रेस समितीच्या निरीक्षक रजनी पाटील यांचे मौन

नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या कॉंग्रेस पक्षात आता प्रदेशाध्यक्ष पद आणि विरोधी पक्ष नेतेपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी संकल्प आमोणकर, अमित पाटकर व जनार्दन भंडारी हे युवा नेते स्पर्धेत आहेत, तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तथा आमदार दिगंबर कामत आणि नुकतेच कॉंग्रेसवासी झालेले आमदार मायकल लोबो यांच्यात चुरस आहे.

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या निरीक्षक रजनी पाटील गोवा दौर्‍यावर आल्या असून, त्यांनी उत्तर व दक्षिण गोवा कॉंग्रेस समिती व अन्य पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन या दोन्ही पदांसाठी पात्र दावेदारांबाबत सर्वांची मते जाणून घेतली. मात्र ही दोन्ही पदे कुणाला मिळतील, याबाबत रजनी पाटील यांनी मौनच बाळगले आहे.

कामत यांना विरोधी पक्ष नेतेपद द्या
विरोधी पक्ष नेतेपद दिगंबर कामत यांना मिळावे, अशी मागणी शुक्रवारी मडगाव येथे झालेल्या बैठकीत रजनी पाटील यांच्याकडे करण्यात आली. ही मागणी करणार्‍यांमध्ये मडगाव पालिकेच्या काही नगरसेवकांचा समावेश आहे.

मायकल लोबोंची दिल्लीवारी
विरोधी पक्षनेते पदासाठीच्या स्पर्धेतील एक दावेदार व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी दिल्लीला प्रयाण केले. ते शनिवारी राहुल गांधी व के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिली.