कॉंग्रेसमध्ये आता चैतन्य, शिस्त येईल

0
85

प्रतापसिंह राणेंसह कॉंग्रेस नेत्यांचा सूर
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी ज्येष्ठ व एक अनुभवी नेते असलेल्या लुईझिन फालेरो यांची निवड झाल्याने पक्षातील युवा नेते तसेच ज्येष्ठ नेत्यांमध्ये चैतन्याचे वारे पसरले असून विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार शांताराम नाईक, आमदार व माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यासह सर्व नेते लुईझिन फालेरो यांच्याकडून अपेक्षा बाळगून असल्याचे वरील नेत्यांशी संवाद साधला असता दिसून आले.विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे हे फालेरो यांच्या निवडीबद्दल बोलताना म्हणाले की, ते एक ज्येष्ठ व अनुभवी असे नेते आहेत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने प्रदेश कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वारे निश्‍चितच वाहू लागेल. लोकांना तोडणे सोपे असते. पण जोडणे मात्र अत्यंत कठीण असते, असे ते म्हणाले.
आता शिस्त येईल : सार्दिन
दक्षिण गोव्याचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, लुईझिन फालेरो हे प्रदेश कॉंग्रेस समिती पुनरुज्जीवीत करण्याचे काम निश्‍चितच करू शकतील. प्रदेशाध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे पद असून त्या पदावरील नेत्याला संयम बाळगावा लागतो. आता फालेरो यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने आता प्रदेश कॉंग्रेस समितीच्या कामात एका प्रकारची शिस्त येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
लुईझिनना पूर्ण पाठिंबा : मडकईकर
आमदार पांडुरंग मडकईकर म्हणाले की, ९८-९९ या साली फालेरो यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने चांगले कार्य केले होते. त्यावेळी त्यांनी संघटना बळकट केली होती. आता सर्व आमदार (मॉविन गुदिन्हो वगळून) व नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळणार असल्याने प्रदेश कॉंग्रेस समितीला उर्जावस्था प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले.
फालेरोंचे सर्व नेत्यांना आमंत्रण
लुईझिन फालेरो हे प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे मंगळवार दि. १४ रोजी स्वीकारणार असून त्या दिवशी विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार व अन्य ज्येष्ठ व युवा नेत्यांना त्यांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये निमंत्रित केले आहे.