कॉंग्रेसमधील गोंधळ स्वपक्षाला मारक

0
415
  • दत्ता भि. नाईक

यापुढील आघाड्या या त्या त्या पक्षाच्या सोयीनुसार घडणार आहेत. आता भाजपाला पर्याय कोण उभा करील अशी चर्चा सुरू झालेली आहे. एकाच घराण्याच्या हातात सत्ता ठेवण्याच्या हट्टाला पेटलेला कॉंग्रेस स्वतःच्याच पक्षाला मारक ठरण्याची शक्यता आहे.

धाडसी क्रॅश लँडिंग करणार्‍या सचिन पायलटचे विमान अखेरीस स्वगृही परतले व राजकारणामधील सत्ताधारी कॉंग्रेसमधील वादळ शमले. वरकरणी हे चहाच्या पेल्यामधील वादळ आहे असे वाटत असले तरी त्याचे मूळ कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्पन्न केलेल्या उच्च दाबाच्या पट्‌ट्यामध्ये आहे हे लक्षात ठेवावे लागेल. पक्षउभारणीसाठी लागणार्‍या नेतृत्वाची वानवा, संघटना जिवंत ठेवण्यासाठी लागणारे संघटन चातुर्य, आगामी समस्यांची पावले ओळखणारे विचारवंत, देशासमोरील समस्या सोडवू शकेल असे व्यक्तिमत्त्व याची वानवा असल्यामुळे एकेकाळी चिरेबंदी वाड्यासारख्या वाटणार्‍या या पक्षाचे पोकळ वासे सर्वांनाच दिसावे असे उघडे पडलेले आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॉंग्रेस पक्ष विसर्जित करावा असे मत महात्माजींनी व्यक्त केले होते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये जे घडले तसे आपल्या देशात घडू नये असे त्यांना वाटत असे. पंडित नेहरूंनी त्यांचा सल्ला मानला नाही. १९४८ साली कॉंग्रेसमधील समाजवादी गट बाहेर पडला. लोकनायक जयप्रकाश नारायण, मा. राममनोहर लोहिया प्रभृतींनी प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. संघटनात्मकदृष्ट्या डबघाईस आलेल्या कॉंग्रेसला गांधी हत्येने हात दिला व १९५२ सालच्या स्वतंत्र भारतातील पहिल्याच निवडणुकीत पं. नेहरूंच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने सर्व विरोधकांचा धुव्वा उडवला.

नेहरूंच्या वंशजांच्या हातात पक्षाची सूत्रे
कॉंग्रेस पक्ष अनेकदा फुटला. १९९१ मध्ये मा. शरद पवार, तारीक अन्वर आणि पी. ए. संगमा या अमर-अकबर-अँथोनी त्रिकुटाने पक्षात घडवून आणलेली अलीकडची मोठी फूट होती. परंतु पक्षांतर्गत युद्ध खर्‍या अर्थाने रंगले. राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांच्या मृत्यूनंतर खाली झालेले राष्ट्रपतीपद कुणी भरावे याबाबत कॉंग्रेस पक्षातील इंदिरा गांधी यांचा गट व पक्षातील स. का. पाटील, अतुल्य घोष, संजीव रेड्डी, निजलिंगप्पा या बुजुर्गांचा एक गट होता. मोरारजी देसाई या गटात उशिरा सहभागी झाले. या गटाला ‘सिंडिकेट’ या नावाने ओळखले जाऊ लागले. उपरोधाने इंदिरा गांधी यांच्या गटाला ‘इंडिकेट’ हे नाव पडले व इंडिकेट विरुद्ध सिंडिकेट असा सामना काही वर्षे बराच रंगला. नंतर सिंडिकेटचा गट कॉंग्रेसमधून बाहेर पडला व संघटना कॉंग्रेस नावाच्या नवीन पक्षाची स्थापना झाली. कॉंग्रेस पक्षाला मुळातून हलवणारी ही फूट होती. परंतु सोव्हिएत संघराज्याची के.जी.बी. ही गुप्तहेर संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहिली. सर्वप्रथम इंदिरा गांधींनी राष्ट्रपतीपदाचे स्वपक्षाचे उमेदवार संजीव रेड्डी यांचा पराभव करून स्वतःचे उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांना विजयी केले व १९७१ मध्ये ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन इंदिरा गांधींनी सर्वांवर मात केली. १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालास मानण्यास नकार देऊन त्यांनी देशावर आणीबाणी लादली व त्याचा परिणाम म्हणून त्यांना १९७७ साली दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या घटनाक्रमातून एक गोष्ट सिद्ध झाली की यापुढे कॉंग्रेसचे भवितव्य नेहरूंच्या वंशजांच्या हातात राहील, भले त्यामुळे पक्षाचे हित होवो वा अहित.

ज्यांच्या कर्तृत्वाला वेसण घालता येईल अशाच व्यक्तींना महत्त्वाची पदे देणे व जुन्या नेतृत्वाला खड्यासारखे बाजूला करणे हा केंद्रीय नेतृत्वाचा एकमेव कार्यक्रम होता. १९७७ साली कॉंग्रेसविरोधी पक्षांची जनता पार्टी स्थापन करून कॉंग्रेसला धूळ चारली खरी; परंतु जनता पार्टीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनसंघ बलवान होतो हे लक्षात आल्यामुळे डाव्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांनी स्वतःहून स्वपक्षाचे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडले. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जनसंघ नेत्यांच्या असलेल्या संबंधाचा विषय पुढे करून दुहेरी सदस्यत्व नावाची एक समस्या उभी केली. परिणामस्वरूप जनसंघाच्या मंडळींनी भारतीय जनता पार्टी स्थापन केली. भाजपाची घोडदौड पाहता हे सर्व माजी कॉंग्रेसविरोधक कॉंग्रेस पक्षाशी आघाडी बनवण्याच्या नादात स्वतःचीच कबर खोदू लागले.

राजीव गांधींची अपत्ये मॉस्कोतील शाळेत
पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या कॉंग्रेसला १९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येमुळे संधी मिळाली व राजीव गांधी सत्तेवर आले. १९९१ साली लोकसभा निवडणुका चालू असतानाच राजीव गांधी यांची हत्या झाल्यामुळे कॉंग्रेसचे नरसिंहराव सत्तेवर आले. त्याचबरोबर कॉंग्रेसमध्ये जन्माने इटालियन असलेल्या सोनिया गांधी यांचे युग सुरू झाले.

राजीव गांधी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा प्रियांका (१५) व राहुल (१३) ही शाळकरी मुले होती. त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो याचा विचार करून भारताचे सोव्हिएत संघराज्यातील राजदूत असलेले टी. एन. कौल यांनी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याशी बोलणी करून त्यांना मॉस्कोमधील स्कूलमध्ये भरती केले होते. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली नसती तर ते निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षनेते बनले असते. त्यांच्या मृत्यूपूर्वी मतदान झालेल्या उत्तर भारतात कॉंग्रेस पक्षाला अतिशय अल्प जागा जिंकता आल्या होत्या. त्यांचा मृत्यू तामीळनाडूतील श्रीपेरूंबुदूर या गावी झाल्यानंतर त्यांच्या हत्येनंतर दक्षिणेकडील मतदारांनी आम्ही खुन्याच्या बाजूने नाही हे सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेसला भरघोस मते दिली व परिस्थिती बदलली. नरसिंहराव यांच्यासारख्या विद्वानाला पाच वर्षे व मनमोहन सिंगांसारख्या मुखदुर्बलास दहा वर्षे सत्तेवर ठेवणारा भारतीय मतदारांचा निर्णय त्यातल्या त्यात बुचकाळ्यात टाकणारा आहे.

कॉंग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष
२०१४ साली केंद्रात भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. २०१९ साली त्याची पुनरावृत्ती झाली व या दोन्ही वेळेस कॉंग्रेसला अनुक्रमे ४४ व ५२ अशा स्थानांवर समाधान मानावे लागले. राहुल गांधींचे कार्ड चालत नाही हे लक्षात आल्यावर कन्या प्रियांका यांना मैदानात उतरवले. परंतु फरक पडला नाही. हल्ली राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तसेच राजीव गांधी फाउंडेशन या नेहरू-गांधी कुटुंबाचा जवळचा संबंध असलेल्या विश्‍वस्त संस्थांची चौकशी सुरू झालेली आहे. या प्र्र्र्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गट समितीचे गठन करण्यात आले आहे. तिन्ही संस्थांवर आर्थिक घोटाळा केल्याबद्दल संशय आहे. गुप्त रीतीने देणग्या स्वीकारणे, कर चुकवेगिरी यांसारख्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे.

पक्षांतर्गत गोंधळ चालू असतानाच एक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे, ती म्हणजे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांमधील पक्षपातळीवर झालेल्या समझोत्या संबंधातली आहे. १९६२ साली कम्युनिस्ट चीनने भारतावर आक्रमण केले होते. ते आक्रमण भारत सरकारला धडा शिकवण्यासाठी केले होते असे स्पष्टीकरण तत्कालीन चिनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून केले होते. भारत सरकारला धडा शिकवणे म्हणजे पंडित नेहरू यांना धडा शिकवणे असा अर्थ होतो. तसे असतानाही नेहरूंची वंशपरंपरा जपणार्‍या कॉंग्रेस पक्षाने चिनी कम्युनिस्ट पार्टीशी परस्पर संबंध करणे म्हणजे आत्मवंचनाच आहे. हा समझोता २००८ साली म्हणजे केंद्रात मनमोहन सिंग सरकार सत्तेवर असताना झाला. जगातील कोणताही कम्युनिस्ट पक्ष विस्तारवादी असतो. विरोधकांचा सफाया करून स्वतःच्या दुष्कृत्यांचे साक्षीदार नष्ट करणे हा त्यांचा शिरस्ता आहे.

यापुढील आघाड्या सोयीनुसार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिन्दूंची संघटना करणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. पंडित नेहरूंनी रा. स्व. संघाचा याच कारणास्तव दुस्वास केला. गांधीहत्येचे निमित्त करून रा. स्व. संघावर बंदी घातली ती त्यानाच नंतर मागे घ्यावी लागली. त्यांचा वारसा इंदिरा गांधींनी चालवला व १९७५ साली संघावर दुसर्‍यांदा बंदी घातली. बंदी घातल्याने संघटना मरत नाही याचा अनुभव कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांना नव्हता असे नव्हे. दोन्ही वेळी संघ संपण्याऐवजी वाढला.

जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा आपल्या देशात इंग्लंड-अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाही प्रस्थापित होईल अशी आशा काही आदर्शवादी राजकीय विचारवंतांकडून व्यक्त केली गेली होती. लवकरच ती फोल असल्याचे सिद्ध झाले. अधूनमधून उभे राहणारे प्रादेशिक अस्मिता जागवणारे पक्ष असे काही होऊ देणार नाहीत व दोन आघाड्यांमध्ये तात्विक कारणांसाठी वाटले जाणेही भविष्यकाळात शक्य नाही. यापुढील आघाड्या या त्या त्या पक्षाच्या सोयीनुसार घडणार आहेत. या प्रसंगी कॉंग्रेसचा पर्याय उभा केला पाहिजे अशी सुरू झालेली चर्चा संपत आली असून आता भाजपाला पर्याय कोण उभा करील अशी चर्चा सुरू झालेली आहे. एकाच घराण्याच्या हातात सत्ता ठेवण्याच्या हट्टाला पेटलेला कॉंग्रेस स्वतःच्या पक्षाला मारक ठरण्याची शक्यता आहे.