कॉंग्रेसच्या तीन बड्या प्रवक्त्यांचे राजीनामे

0
7

>> अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांची पत्रकार परिषदेत माहिती

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता जवळ येऊन ठेपली असून ती रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागला असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खर्गे यांनी, दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन या तीन प्रवक्त्यांनी उपस्थित होते. या दरम्यान कॉंग्रेसच्या या कॉंग्रेसच्या बड्या तीन प्रवक्त्यांनी राजीनामे दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आता हे तिन्ही प्रवक्ते कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचार करणार आहेत.

यावेळी बोलताना पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ यांनी, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून खरगे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेत श्री. खर्गे यांनी, कठोर संघर्षानंतर मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी कुठेही गेलो तरी तिथे पूर्णवेळ काम करण्याची माझी सवय आहे. गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले आहे. दहा वर्षे कॉंग्रेस सरकारमध्ये असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला नाही, की त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न केला नाही. आजही राहुल गांधी उन्हात भारत जोडो यात्रा करत आहेत. त्यांच्याशी आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी मी नक्कीच चर्चा करेन असे सांगितले.
खर्गेंच्या जागी कोण?
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या धोरणानुसार राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी कॉंग्रेसच्या तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह किंवा प्रमोद तिवारी यांच्यापैकी कोणालाही राज्यसभेत विरोधी पक्षनेते केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.