पणजी (न. प्र.)
विरोधी कॉंग्रेस पक्षाचे आमदार व प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यानी काल राजभवनवर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना एक निवेदन सादर करून खाण लिज नूतनीकरण घोटाळा प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच खाण सचिव पवन कुमार सेन, खाण संचालक प्रसन्न आचार्य तसेच मुख्यमंत्र्याचे सचिव कृष्णमूर्ती यांच्याविरुद्ध ३ व ४ ऑक्टोबर रोजी जी तक्रार केलेली आहे त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.
राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात आमदार प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, निळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, जेनिफर मोन्सेर्रात, आंतोनियो फर्नांडिस, रवी नाईक, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस, विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर आदींचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांची आरोग्यविषयक
माहिती जनतेला द्यावी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आरोग्य कसे आहे, जनतेस कळायला हवे. त्यासाठी त्यांच्या आरोग्याची माहिती देण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणीही आम्ही राज्यपालांकडे केली आहे, असे कवळेकर म्हणाले.
खाण लिज नूतनीकरण घोटाळा प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने जी तक्रार दिलेली आहे त्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल या नात्याने मुख्य सचिव, मुख्य दक्षता अधिकारी तसेच पोलीस महासंचालक यांना द्यावेत, अशी मागणी आम्ही राजभवनवर राज्यपाल सिन्हा यांच्याकडे केली, असे राजभवनबाहेर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष नेते कवळेकर यांनी सांगितले.
हे पाचवे निवेदन
राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना कॉंग्रेस पक्षाने आतापर्यंत दिलेले हे पाचवे निवेदन असल्याचे कवळेकर यानी यावेळी स्पष्ट केले.
खाण लिज नूतनीकरण घोटाळ्याबरोबरच ‘बिच क्लिनिंग’ घोटाळा, गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या समिती खासगी कंपन्यांना देण्याचा घोटाळा, तसेच प्रादेशिक आराखडा घोटाळा, भाजप पदाधिकार्याचे केटामाईन प्रकरण, अमली पदार्थ व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यास सरकारला आलेले अपयश व ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, कॅसिनो घोटाळा, फॉर्मेलीन घोटाळा, स्मार्ट सिटी घोटाळा, आल्वरा जमीन घोटाळा, एलईडी पथदीप घोटाळा, मेटास्ट्रिप जमीन घोटाळा, असे कित्येक घोटाळे झालेले असून ह्या घोटाळ्यांची चौकशी होण्याची गरज असल्याचे आम्ही राज्यपालांच्या नजरेस आणून दिले आहे, असे कवळेकर यानी सांगितले.