कॉंग्रेसचे म्हादई जागोर आंदोलन यशस्वी ः डिमेलो

0
116

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर गोव्यातील जनतेच्या म्हादई नदीबाबतची तीव्र भावना मांडण्यासाठी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात कॉंग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना निदर्शने करावी लागली. कॉंग्रेसचे म्हादई जागोर आंदोलन यशस्वी झाल्याने केंद्रीय मंत्री जावडेकर यांना इफ्फीच्या समारोप सोहळ्यापासून दूर राहावे लागले, असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला.
कॉंग्रेसचा इफ्फीच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्री जावडेकर हे समारोप सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने कॉंग्रेस पक्षाने कोणतीही निदर्शने केली नाहीत, असेही डिमेलो यांनी सांगितले.

मंत्री जावडेकर यांचे म्हादईच्या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यत कॉंग्रेसला निदर्शने करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी म्हादई प्रश्‍नी कर्नाटकला दिलेले पर्यावरण पत्र मागे घेतल्यानंतर हा प्रश्‍न सोडविल्याचे क्रेडिट कुणी घेऊ नये, असे आवाहन केले आहे. भाजपने सुध्दा म्हादईचा प्रश्‍न सोडवल्याचे क्रेडिट घेऊ नये. तसेच सरकारने जमावबंदीचा आदेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी डिमेलो यांनी केली.

कॉंग्रेसचा १० रोजी मोर्चा
कॉंग्रेस पक्षातर्फे देशाच्या आर्थिक स्थितीबाबत जनजागृतीसाठी पणजीत १० डिसेंबर २०१९ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच १४ डिसेंबरला नवी दिल्ली येथे येथे आयोजित देशपातळीवरील मोर्चात कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असेही डिमेलो यांनी सांगितले.