विजयाची भूक कायम ठेवावी व यंदा होणार्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.
जम्मू काश्मीर, हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका यंदा होत असून देशातून कॉंग्रेसचे पूर्ण उच्चाटन अजून झालेले नाही, हे लक्षात ठेवावे लागेल, असे ते म्हणाले.
पक्षाचे कार्य तळागाळात पोचल्याशिवाय तसेच पक्षाच्या जाहिरनाम्यानुसार सर्व मंत्र्यांनी काम केल्याशिवाय भाजप जास्तकाळ सत्तेत टिकू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अमित शहा यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आले. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, हरयाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्याबाबत यावेळी ठरविण्यात आले.