>> तरुणांना संधी देण्याचे कॉंग्रेस स्थापनादिनी आवाहन
राज्यातील राजकारणात आपण ५० वर्षे पूर्ण केली आहेत. आता विश्रांती घेऊन तरुणांना संधी देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या १३७ व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना काल येथे केले.
राणे यांनी यावेळी आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना सांगितले की, आपण मगोपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आत्तापर्यंत कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. कॉंग्रेस पक्षाने राज्याचा मुख्यमंत्री, मंत्री, गोवा विधानसभेचा सभापतिपद भूषविण्याची संधी दिली. तसेच, गोव्याच्या विकासाला हातभार लावण्याची संधी दिली.
राज्यात कॉंग्रेस पक्षाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहे. कॉँग्रेस पक्षाला उज्वल भवितव्य आहे. आगामी काळात आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी निवृत्ती स्वीकारून तरुणांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले. या स्थापना दिन कार्यक्रमाला कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन व इतरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे व इतरांचा सन्मान करण्यात आला.