– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
कॉंग्रेसचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर नुकतेच दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडले. कॉंग्रेसच्या या चिंतन शिबिराने पक्षातील बंडखोरांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत, तसेच पक्षाची घडी नीट बसण्यासाठी येथील श्रेष्ठींना योग्य ती पावले उचलण्याबरोबरच विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी अधिक आक्रमक बनावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. कॉंग्रेसाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा राज्याचे प्रभारी दिग्विजयसिंह यांनी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका करीत त्यांनी आपला कारभार व्यवस्थितपणे करावा, यासाठी कॉंग्रेस महत्त्वाची विरोधी भूमिका बजावणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराने भाजपाची चिंता वाढवली आहे, हे मात्र निश्चित.सध्या कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो व बाबूश मोन्सेर्रात यांच्याबद्दल पक्षात संतापाची भावना आहे. एक तर त्यांना कॉंग्रेस पक्षनिष्ठ राहू द्या किंवा त्यांनी बाहेरची तरी वाट दाखवा या पक्ष कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर खासदार दिग्विजयसिंह बरेच गंभीर असल्याचे दिसले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या दोन्ही आमदारांच्या विरूद्ध शिस्तभंगाच्या आणि बंडखोरीच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. गुदिन्हो हे स्वतःवरील खटल्यातून आपली कातडी वाचवण्यासाठी भाजपाशी जवळीक साधत आहेत तर मोन्सेर्रात आपल्या सांताक्रूझ मतदारसंघातील मतदारांचा विश्वासघात करून अपक्ष म्हणून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत, हे आपल्या लक्षात आले आहे. त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात अपयश आल्यास गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती आणि कॉंग्रेसाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींनी पाठवावा, त्यानंतर या दोन्ही आमदारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिग्विजयसिंह यांनी दिला आहे.
पक्षकार्यकर्ते आणि आमदार यांच्याशी केलेल्या वार्तालापात दिग्विजयसिंह यांनी सांगितले की, विधानसभेत तसेच विधानसभेच्या बाहेरही कॉंग्रेस पक्षाने विरोधक म्हणून चांगली भूमिका बजावण्याची गरज असून कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते तथा आमदारांनी मवाळ भूमिका सोडून देऊन अधिक आक्रमक बनण्याची आवश्यकता आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? ती केव्हा पूर्ण करणार? की मतदारांना खोट्या आश्वासनांची खैरात करून फक्त खुर्चीच बळकावयाची होती का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेतली पाहिजेत, असे सुनावले.
कॉंग्रेसाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी तर अनेक महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडली. ते म्हणाले,‘गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदाच राज्याची आर्थिक व्यवस्था खूपच डबघाईला आलेली आहे, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. लोकायुक्त व माहिती आयुक्त स्थापन करण्यात, तसेच प्रादेशिक आराखडा निर्माण करण्यास आलेले अपयश आणि खनिज व्यवस्थेमुळे बुडालेला महसूल इत्यादी गोष्टींवर फालेरो यांनी सरकारला उघडे पाडले. तसेच खाणपट्टे नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेत चाललेली दिरंगाई पाहता खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे, असे वाटत नाही, असे खाण अवलंबितांना वाटते. यावर सरकारने आपली भूमिका जाहीर करावी व ८० हजार लोकांचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असे मत अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सरकार कुळ-मुंडकारांना शेंडी लावत असून ते कुळ-मुंडकारांचे भक्षक कसे आहेत व कूळ-मुंडकारांचे खटले मामलेदार कोर्टातून दिवाणी कोर्टात वर्ग करून ते मागीलदाराने कशी भाटकारशाही आणत आहेत, याचे विस्तृत विवेचन केले व पक्षाच्या कार्यक्रमात कूळ-मुंडकारांना संरक्षण देण्याबाबत योग्य ती पावले उचलली जातील, याची ग्वाही फालेरो यांनी आपल्या भाषणातून दिली.
या दोन दिवशीय शिबिरात ३० महिने पूर्ण केलेल्या भाजपा सरकारावर १५ कलमी आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. यात राज्य सरकार जनतेवर फक्त आश्वासनांचा वर्षाव करीत आहे, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. सरकारकडून हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे, आदी १५ आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच केंद्रात असलेल्या भाजप सरकारने परदेशातील काळा पैसा शंभर दिवसांत परत आणण्याच्या आश्वासनांपासून तो प्रत्येक भारतीयांच्या बँक खात्यात ३ लाख रुपये जमा करणार असल्याच्या आश्वासनांपासून कसा ‘यू-टर्न’ घेतला आहे, त्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
कॉंग्रेसच्या या चिंतन शिबिराची बातमी वाचून भाजपाची चिंता वाढली व प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी लगेच पत्रकारपरिषद घेऊन भ्रष्टाचाराचे पूर्णपणे उच्चाटन होणे शक्य नसल्याचे वक्तव्य केले, तर परत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणुकीच्या वेळी भ्रष्टाचाराला मुळीच थारा देणार नाही, (झिरो टॉलरन्स) अशी घोषणा केली होती आणि आता डॉ. मिस्किता यांनी भ्रष्टाचाराचे उच्चाटन करणे शक्य नसल्याचे हास्यास्पद विधान करणे हे यू-टर्नचेच उदाहरण आहे.
एकूण कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराने या पक्षातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कामाला लावले आहे, तर भाजपाच्या सततच्या ‘यू-टर्न’वर बोट ठेवून त्यांची चिंता वाढवली आहे.