कैलाश सत्यार्थी
२०१४ शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी भारतीय कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानी मलाला युसूफजाई यांची संयुक्तपणे निवड झाली. या दोघांचा थोडक्यात परिचय
कैलाश सत्यार्थी (६०) हे बचपन बचाव आंदोलन नावाची बिगर सरकारी संघटना चालवतात. तस्करी तसेच बाल मजुरीतून मुलांची सोडवणूक करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम गेली अनेक वर्षे ते करत आहेत. बाल मित्र ग्राम-संकल्पनेची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. बालमजुरीपासून मुक्त, मुलांना शिक्षण देणारे, मुलांचे शोषण न करणारे आदर्श गाव घडविण्याची त्यांची ही संकल्पना आहे.‘सत्यार्थी यांनी महात्मा गांधींची परंपरा सांभाळताना अनेक शांततापूर्ण आंदोलने केली आहेत. आर्थिक लाभासाठी होणार्या मुलांच्या भीषण शोषणाविरुद्ध त्यांचा लढा आधारलेला आहे.’असा गौरव खुद्द नोबेल समितीने केला आहे. सत्यार्थी हे नोबेल मिळालेले सातवे भारतीय तर शांततेचे नोबेल लाभलेले मदर तेरेसा नंतरचे दुसरे भारतीय ठरले आहेत.
११ जानेवारी १९५४ रोजी जन्मलेले कैलाश सत्यार्थी यांनी आतापर्यंत सुमारे ८० हजार मुलांना तस्करी, बालमजूर यातून मुक्त करून त्यांना शिक्षण देऊन पुनर्वसन केले आहे. सध्या ते दिल्लीत पत्नी, मुलगा, मुलगी, सून व सुटका केलेल्या अनेक मुलांसोबत राहतात. ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर तसेच ग्लोबल केंपेन फॉर एड्यूकेशन अशा मुलांसाठीच्या जागतिक स्तरावरील दोन मोठ्या चळवळींत त्यांचा सहभाग होता. दक्षिण आशियात ‘रुगमार्क’ ही पादनात बालमजूरांचा सहभाग नसल्याचे प्रमाणीकरण करणारी यंत्रणा त्यांनी विकसित करून त्याचा प्रसार केला. ८० व ९०च्या दशकांत या संकल्पनेचा त्यांनी युरोप, अमेरिकेत प्रसार केला. बालमजूरी हा मानव हक्काचा मुद्दा असल्याचे प्रस्थापित करण्यात त्यांचे योगदान आहे. गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, लोकसंख्या वाढ या समस्यांचा बालमजूरीशी थेट संबंध असल्याचे ते वारंवार सांगतात. त्यामुळे यासंबंधी चळवळींतही ते सहभागी होतात. कैलाश यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले आहेत. २०११मध्ये दिल्लीतील दुकानांतून गुलाम बालमजूरांची सुटका तसेच सर्कस माफियांच्या तावडीतून मुलांची सुटका करताना त्यांच्यावर हल्ले झाले होते.
दरम्यान, याअगोदरही अनेक पुरस्कारांनी त्यांची दखल घेतली असून युनेस्कोच्या समितीवरही त्यांनी काम केले आहे.
मलाला युसूफजाई
मलाला युसूफजई (१७) ही तालिबान्यांचा बंदी आदेश झुगारून मुलींना साक्षर करण्यासाठी वावरते आहे. तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला करून तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्यानंतर ती सर्वप्रथम ठळकपणे प्रकाशात आली होती. मलाला हिने महिलांच्या हक्कांसंबंधी लिहिलेल्या ब्लॉगनंतर तालिबान्यांनी शिक्षा देण्यासाठी हे कृत्य केले होते. या हल्ल्यातून हिमतीने बाहेर पडल्यानंतर त्याच जोमाने तिने आपले मुलींच्या हक्कासाठीचे व मुलींच्या शिक्षणासाठीचे आंदोलन चालू ठेवले होते. तिच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर तिला राणी एलिझाबेथच्या बर्मिंगम इस्पितळात उपचारांसाठी नेण्यात आले होते. गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाला तिने संबोधित केले होते. बराक ओबामांनीही तिला निमंत्रित केले. गेल्या वषीही तिचे पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. ‘आय एम मलाला’ हे पुस्तकही तिने लिहिले आहे.
१२ जुलै १९९७ रोजी जन्मलेली मलाला ही पाकिस्तानच्या स्वाट जिल्ह्यातील इशान्य खैबर पख्तून प्रांताची रहिवासी आहे. स्वाट भागात तालिबान्यांचा कडवा विरोध असतानाही तिने मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. २००९ साली वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी तिने टोपणनावाने बीबीसीवर लेख लिहून स्वाट भागातील तालिबान्यांचे अतिक्रमण, तेथील मुलींच्या शिक्षणावर निर्बंध हे सर्व उघड केले. त्यानंतर न्यू यॉर्क टाइम्सने तिच्यावर माहितीपट तयार केला. त्यानंतर सातत्याने तिने वृत्तपत्र व इतर माध्यमांतून तालिबान्यांच्या क्रुर कहाण्यांविषयी निर्भिडपणे सांगितले. २०१२ रोजी तणावग्रस्त स्थिती असतानाही ती शाळेला जाण्यासाठी बसमध्ये चढली असतान एका हल्लेखोराने तिच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर कितीतरी दिवस ती बेशुद्धावस्थेत होते.
या घटनेनंतर ५० पाकिस्तानी मौलवींनी मलाला हिला मारण्याचा प्रयत्न करणार्यांविरुद्ध फतवा जाहीर केला. मात्र तालिबान्यांनी तिला व तिच्या वडलांना ठार मारणार असल्याचे जाहीर केले. तिच्या साहसाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आय एम मलाला’ ही मोहीम उघडून २०१५पर्यंत पृथ्वीवरील सर्व मुले शाळेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला.