केवळ हलाहल

0
11

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या कथित अनुद्गारांसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात उभ्या राहिलेल्या संघर्षाची परिणती काल संसदेच्या मकरद्वारासमोर काही खासदारांचे जखमी होण्यात झाली. भाजपच्या दोघा जखमी खासदारांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच आपल्याशी धक्काबुक्की केल्याचा लावलेला आरोप, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपणही जखमी झाल्याचा केलेला प्रत्यारोप ह्या सगळ्या घटना आज देशामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील दरी किती रुंदावत केली आहे हेच दर्शवतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेवेळी राज्यसभेत बोलताना ‘अलीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा नारा देण्याची फॅशन झाली आहे. तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्घ मिळाला असता’ असे जे वक्तव्य केले, त्यातून हा सारा संघर्ष भडकला आहे. विरोधी पक्षांना त्यामुळे एक मोठे हत्यार गवसले. वास्तविक, शहा यांना काँग्रेस नेतृत्वाने आंबेडकरांची कशी वेळोवेळी मानहानी केली, हेच दाखवून द्यायचे होते. त्यांनी खरे तर आपल्या भाषणामध्ये पं. जवाहरलाल नेहरूंनी आंबेडकरांची कशी उपेक्षा केली, त्याचे दाखले दिले. मात्र, आपले म्हणणे मांडताना शहांनी वरील वाक्य उद्गारल्याने, आधीच भाजपला ‘मनुवादी’ म्हणणाऱ्या विरोधी पक्षांना त्यातून एक मोठा मुद्दा गवसला. भाजपलाही ह्याच्या परिणामांची जाणीव झाली आहे. त्यामुळे शहांच्या समर्थनार्थ स्वतः पंतप्रधान जातीने पुढे सरसावले आणि त्यांनी ह्या विषयावर लागोपाठ सहा ट्वीट केले. शिवाय, शहांच्या भाषणाची चित्रफीत सर्वत्र पसरवल्याबद्दल काँग्रेसला नोटीसही बजावली गेली आहे. शहांच्या भाषणातील उपरोक्त विधान जर सोडले, तर त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे खरे तर काँग्रेसला अडचणीत आणणारेच आहेत. पं. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातून घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकरांना राजीनामा का द्यावा लागला, त्याकडे शहांनी निर्देश केलेला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींची उपेक्षा, नेहरूंच्या विदेश नीतीची असफलता आणि काश्मीरसंदर्भात 370 कलम लागू करण्यास विरोध म्हणून आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळाला रामराम ठोकला होता असे शहांना दाखवून द्यायचे होते. यासंदर्भात बी. सी. रॉय यांनी नेहरूंना पत्र पाठवून राजगोपालचारी व आंबेडकरांच्या जाण्याने आपले मंत्रिमंडळ कमजोर होणार नाही का, असा सवाल केला होता. त्यावर नेहरूंनी त्यांना जे उत्तर पाठवले होते ते नेहरूंच्या समग्र पत्रव्यवहाराच्या एका खंडात आहे. त्यात आंबेडकर मंत्रिमंडळातून गेल्याने मंत्रिमंडळ कमजोर होणार नाही असे विधान नेहरूंनी केले होते, त्याकडे अमित शहा यांनी निर्देश केला आहे. दुसरे उदाहरण त्यांनी दिले ते महू ह्या आंबेडकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्यासंबंधी नेहरूंनी मुंबईच्या महापौरांना 18 जून 1959 रोजी पाठवलेल्या पत्रात दाखवलेल्या अनास्थेचा. असे स्मारक उभारायचे तर ते खासगी पैशातून व्हायला हवे, सरकारने त्याला साह्य करणे उचित नाही असे मत नेहरूंनी व्यक्त केले होते, त्याकडेही शहांनी निर्देश केला. परंतु पुढच्या काळात नेहरू गांधी घराण्याची असंख्य स्मारके सरकारी खर्चातून देशभरात उभी झाली हेही वास्तव आहे. काँग्रेस आज राजकीय फायद्यासाठी आंबेडकरांचे नाव घेत असली आणि वारसा सांगत असली, तरी आंबेडकरांच्या हयातीत काँग्रेसने त्यांचा अनादर आणि उपेक्षाच केली, असे शहा आणि त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या भाजपकडून ठासून सांगितले जाऊ लागले आहे. आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी उमेदवार उभे केले होते, त्याकडेही भाजपकडून निर्देश केला जात असल्याचे दिसते. 1952 च्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईत आंबेडकरांविरुद्ध काँग्रेसने काजरोळकर यांना उभे केले होते. त्यानंतरच्या 1954 च्या निवडणुकीत भंडाऱ्यातही आंबेडकरांविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला होता, ह्या सगळ्या इतिहासाला आता उजाळा दिला जाताना दिसतो. आंबेडकरांना नेहरूंनी ‘भारतरत्न’ दिले नाही. मात्र, स्वतः नेहरूंनी 1955 साली स्वतःच्या गळ्यात ती बिरुदावली स्वीकारली व पुढे 71 साली इंदिरा गांधींनीही तेच केले, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. आंबेडकरांचा हा विषय सामाजिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे अमित शहांच्या वरील वक्तव्यामुळे भाजपला आंबेडकरविरोधी ठरवण्यासाठी काँग्रेस व अन्य विरोधक आणि काँग्रेसला आंबेडकरविरोधी ठरवण्यासाठी भाजप यांच्यातील संघर्षाला तोंड फुटले आहे. संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने होणाऱ्या सांसदीय चर्चेतून काही चांगले अमृतमंथन होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यातून सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमेकांप्रतीच्या टोकाच्या विरोधाचे हलाहलच बाहेर आले आहे.