केवळ पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी म्हणजे नागरिकत्व नव्हे

0
115

पोर्तुगीज कौन्सुल जनरलचे स्पष्टीकरण
एखाद्या विदेशी नागरिकाला जर पोर्तुगीज नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्यासाठी त्याला पोर्तुगीज प्रशासनाकडून कायदेशीररीत्या कार्तांव-द-सिदादांव हे ओळखपत्र मिळवावे लागते. जोपर्यंत त्याला ते ओळखपत्र मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती पोर्तुगीज नागरिक ठरू शकत नसल्याचे गोव्यातील पोर्तुगीज कौन्सुल जनरल डॉ. रुई कार्व्हालो बासैरा यांनी काल अनौपचारिकरीत्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, एखाद्या विदेशी नागरिकाने आपली जन्मनोंदणी पोर्तुगालमध्ये केलेली असेल, पण त्याला कार्तांव-द-सिदादांव हे ओळखपत्र मिळालेले नसेल तर तो नागरिक पोर्तुगीज नागरिक ठरू शकत नसल्याचे ते म्हणाले. कार्तांव-द-सिदादांव हे ओळखपत्र मिळाल्यानंतरच पोर्तुगीज नागरिक बनण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होऊन ती व्यक्ती पोर्तुगीज नागरिक ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.गोव्यातील एक-दोन आमदार व काही अधिकार्‍यांची जन्मनोंदणी पोर्तुगालमध्ये झालेली असल्याने व त्यांच्याकडे पोर्तुगालचा पासपोर्ट असल्याने ते पोर्तुगीज नागरिक ठरत असल्याचा जो दावा करण्यात येत आहे त्या पार्श्‍वभूमीवर खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकारानी डॉ. बासैरा याना छेडले असता त्यानी वरील स्पष्टीकरण केले. पोर्तुगीज पासपोर्ट असला म्हणून कुणी पोर्तुगीज नागरिक होऊ शकत नसल्याचेही त्यानी स्पष्ट केले. पासपोर्ट ही केवळ प्रवासासाठीची कागदपत्रे असतात, असे ते म्हणाले.