- मीना समुद्र
केळ हे झाड वर्षातून एकदाच येते, एकदाच फुलते, एकदाच फळते आणि मग निर्मोहीपणे, विरक्तपणे दुसर्या केळीच्या कोंबाला जागा देऊन स्वतः नष्ट होते. केळीच्या सुफल, समृद्ध, संपन्न जीवनाचे शुभत्व आणि पावित्र्य तिच्या या सार्याच कार्यात असावे.
मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊ या, मामाच्या गावाला जाऊ या…
बालगोपाळांचे हे अतिशय लोकप्रिय गाणे. यातल्या लाडक्या मामाच्या गावाला जातानाची मामीची आठवण अगदी लेकराबाळांच्या निर्भरतेला साजेशी. त्यांना त्यांची मामी मोठ्या प्रेमाने रोज पोळी आणि केळ्याची शिकरण खाऊ घालते. यात तिचा सुगरणपणा तो कसला आलाय, असं वाटायचं. पण दारची किंवा घरातल्या घडातली केळी काढून, दूधसाखरेत ती कुस्करून किंवा काप करून घातली की झाली शिकरण. मामी भाचरांचे लाड करते, त्यांना कौतुकाने गोडधोड खाऊ घालते ही बाब त्या लहानग्यांच्या जिवाला पुरेशी आहे.
अशी ही केळ्यांची शिकरण. हा अत्यंत झटपट होणारा, करायला सोपा असा गोडाचा पदार्थ. साल सोलून नुसतं खायलाही केळं हे अतिशय सोपं, सुटसुटीत. लहान बाळालाही त्याचा गर भरवतात आणि मुलांच्या वाढीसाठी, उंचीसाठी पोषक म्हणूनही केळं हे फळ सर्रास खाल्लं जातं. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारं, सहजसाध्य, स्वस्त खाता येण्याजोगं. कापा, चिरा, काटे काढा, साल काढा, बी काढा अशा फणस-अननसासारख्या त्रासदायक गोष्टी नसतात आणि ते भूकही भागवते.
वसई, सोनकेळी, रसबाळी, देशी, केरळी लांबट केळी, भाजीची केळी अशा केळ्यांच्या नाना जाती स्थानपरत्वे मिळतात. हिरवी, पिवळी आणि केशरी अशा सालींची ही केळी बाजारात वेताच्या टोपल्यांतून, हातगाड्यांवर, दुकानात गाठीगाठींच्या दोरीला अडकवून ठेवलेले घड, तर कधी पूर्ण लोंगर अशा स्वरूपात विकायला येतात तेव्हा ती लक्ष वेधून घेतातच; आणि आपल्या टवटवीत, घवघवीतपणाने मोठी शोभिवंतही दिसतात. फक्त ती फार दिवस टिकत नाहीत; म्हणूनच अनेक पदार्थ बनवून ती टिकवली जातात. केळ्याचे काप, वेपर्स, गोल-लांबट चिप्स, कच्च्या केळ्यांची भाजी, जाम, बर्फी, सांदण, पूर्ण पिकलेल्या केळ्यांचं गोडाचं थालीपीठ अशा अनेक पदार्थांसाठी कच्ची व पक्की केळी वापरता येतात. केरळी केशरी केळी नुसती उकडूनही खातात म्हणे! पण अशी उकडलेली केळी कुस्करून, त्यावर तूप घालून, पापडांचा चुरा घालून ती हॉलमध्ये ‘डिश’ म्हणून दिली जाते हे ऐकल्यावर नवलच वाटलं होतं.
लग्नमुंजीआधी घरी किंवा नातलगांकडे नवरा/नवरी/मुंजा मुलगा आणि त्यांच्याशी संबंधितांसाठी केळवण केले जाते. हे म्हणजे त्या विधीआधी महिनापंधरा दिवस चालणारे भोजन. यात दह्यात केळ्याचे काप आणि चवीपुरती साखर टाकून केळ्याची कोशिंबीर अवश्य केली जाते. केळी आणि इतर फळांचे दुधातले किंवा दह्यातले फ्रूटसॅलड हाही तसा सर्वमान्य, पचायला हलका आणि बर्याच जणांचा आवडता असा पदार्थ.
सुधारसात केळ्याचे काप घालून आयत्यावेळच्या पाहुण्यांसाठी गोड पदार्थ पूर्वी बनविला जात असे. सत्यनारायणाच्या प्रसादावर केळ्याचे काप घालून तो केळ्याच्याच पानांनी झाकला जातो. रव्याबरोबरच केळी तुपावर परतून, दूधसाखर घालून केलेल्या प्रसादाला एक सुंदर, सुरेख स्वाद येतो. समृद्धी, स्वाद, संतुष्टी, पुष्टी यांमुळे केळ्यांना फार मोठे स्थान आपल्या जीवनात आहे.
सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितलं की, लंडनमध्ये राहणार्या त्यांच्या पाच वर्षांच्या नातीला त्यांनी रोज केळं खायला सांगितलं तेव्हा त्या चुणचुणीत मुलीनं ते खाण्याची कारणं विचारली तेव्हा त्यांनी तिला एक गोष्ट सांगितली-
दुर्वास अतिशय रागीट ऋषी होते. लगेच क्रोधीत होऊन ते शाप देत. त्यामुळे कुणी त्यांच्याजवळ टिकत नसे. मात्र त्यांची पत्नी खूप काळ त्यांच्याजवळ राहिली म्हणून तिने त्यांच्याकडे वर मागितला- ‘देवलोकांत न उगवणारे, पृथ्वीवरच येणारे, देवपूजेसाठी वापरता येईल असे, बी नसलेले, ज्याचे सगळे भाग उपयोगात येतील असे, वर्षातून एकदाच येणारे, एकदाच फुलणारे, एकदाच फळ देणारे असे झाड मला द्या!’ ऋषींनी तो कदलीफलाच्या रूपाने म्हणजे केळीच्या झाडाच्या रूपाने तिला दिला. अतिशय सुज्ञपणाने मागितलेला हा वर मानवतेला वरदान ठरला आणि पृथ्वीवर सर्वत्र कदलीवने निर्माण झाली. या फळाने बुद्धी, हुशारी वाढते. हे ऐकून सुधा मूर्ती यांच्या नातीने ते फळ खाल्ले.
केळीचं झाड मातीतच उगवतं. देवपूजेसाठी केळी लागतातच. लक्ष्मीपूजा, सत्यनारायण पूजा, ओटीभरणातल्या पाच फळांपैकी एक आणि कुठल्याही पूजेसाठी केळीची अख्खी फणी, घड ठेवलेला असतो. यात बी नसते. याचे पान, फूल, फळ, बुंधा सगळ्यांचाच उपयोग होतो. केळफूल (कोका) भाजीसाठी वापरतात. बुंधा खूप पाणीदार असतो. त्याच्या आतल्या भागाची भाजी केली जाते आणि तो ठेचून त्याचे पाणी पापडाचे पीठ भिजवताना वापरतात, त्यामुळे पापड हलके होतात. केळीला खूप पाणी लागते, त्यामुळे तिची पाने नेहमी हिरवीगार, तजेलदार दिसतात. पोपटी सुरळी उलगडत जाताना तिचा तलमपणा उन्हात चकाकतो. वार्यावादळात मात्र केळीची लांबरूंद पाने फाटून चिरफळ्या उडतात. हिरवीगार केळ आणि तिला लागलेले केळफूल, केळीचा लोंगर बाहेर पडताना वजनाने ती वाकते आणि अतिशय कमनीय दिसते. म्हणून तिचा उपयोग गृहप्रवेश, लग्नविधीसारख्या मंगलप्रसंगी, सणासमारंभाला, घरगुती कार्यातही कमानी उभारून केला जातो. सुंदरतेबरोबरच प्रसन्नता आणि मनोज्ञता येते आणि अतिथी-अभ्यांगतांचे, पै-पाहुण्यांचे स्वागतही खूप झोकदार होते. गोवा-कोकण भागात पावसाठी प्रदेशात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात दिसते. जलसंपन्न भागात ती उगवत असल्याने तिला सौंदर्य, प्रसन्नतेबरोबरच शीतलता प्राप्त झालेली आहे. तिच्या सान्निध्यात येणार्या कुणालाही हे जाणवते.
मात्र हे झाड वर्षातून एकदाच येते, एकदाच फुलते, एकदाच फळते आणि मग निर्मोहीपणे, विरक्तपणे दुसर्या केळीच्या कोंबाला जागा देऊन स्वतः नष्ट होते, विराम पावते. केळीच्या सुफल, समृद्ध, संपन्न जीवनाचे शुभत्व आणि पावित्र्य तिच्या या सार्याच कार्यात असावे म्हणून तर तिला शेताभाताची देवता मानली जाते, लक्ष्मीरूप मानली जाते आणि वस्त्राभरणांनी तिची श्रद्धापूर्वक पूजाही केली जाते.
लोकगीतात केळ ही स्त्रीजीवनाशी घनिष्ठ संबंध राखून असलेली दिसते-
जन्मामध्ये जन्म बाई केळीबाईचा चांगला
भर्तारावाचून गर्भ नारीला राहिला
श्रेष्ठ पतिव्रता केळीबाई म्हणू तुला
विनाभोग गर्भ मरणाचा गं सोहळा
असे हे पवित्र केळपान बाळाच्या अकराव्या दिवशी स्नान घालून त्याला ठेवण्यासाठी वापरतात आणि देहावसानानंतर एखादा मृतदेह ठेवण्यासाठीही! जन्म-मृत्यूचा सेतू होणारी जन्मभराची सोबतीण अशी ही केळ!