केल्याने देशाटन

0
825
  • संदीप मणेरीकर
    (पर्वरी)

लहानपणापासून सतत ऐकू आलेली एक ओळ..
केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार,
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार
खरं तर ही ओळ शालेय अभ्यासक्रमात सतत पाठ झालेली. पण या ओळींची सत्यता मात्र अनुभवण्यासाठी भटकंती करत राहण्याची गरज असते. मुळात अशी भटकंती आवडत नाही असा माणूस विरळाच. वेगवेगळ्या जागी जाऊन आणि त्या पाहून आनंद मिळतो आणि अनुभवातून ज्ञानाच्याही कक्षा विस्तारतात. म्हणूनच तर चातुर्य मिळविण्याच्या ‘पंडित मैत्री’ आणि ‘सभेत संचार’ या दोन मार्गांच्या आधी देशाटनाला स्थान मिळाले आहे. खरं तर सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे यांची पूर्वरंग, अपूर्वाई किंवा मीना प्रभू यांची प्रवासवर्णनं वाचल्यावर मनात आपणही कुठेतरी असं फिरून यावं आणि प्रवासाची मजा लुटावी असं वाटून जातं. अर्थात बर्‍याचवेळा प्रापंचिक अडचणी, आर्थिक चणचण अशा काही पाचवीला पुजलेल्या असल्यामुळे भटकंती किंवा देशाटन करणं शक्य होत नाही. पण बाहेरच्या देशात प्रवासाला जाण्यापेक्षा किमान देशातल्या देशात तरी प्रवास करावा.
पूर्वी म्हणायचे की, जन्मात एकदा तरी मुंबईला जाऊन यावं माणसानं. नंतर मुंबईला माणसं रात्री जाऊ लागली आणि दुसर्‍या दिवशी तेथून निघून येऊ लागली म्हटल्यावर त्या वाक्याची व्याप्ती वाढली आणि मग जन्मात एकदा तरी अमेरिकेला जाऊन यावं असं म्हटलं जाऊ लागलं.

प्रवासाची ओढ ही मानवास खरं तर निसर्गताच लाभलेली आहे. अगदी बाल्यावस्थेपासून भूर जायला आपले मन आसुसलेले असतें. अगदी तान्ह्याबाळाला पण आपण भूर जाऊया म्हणून शांत करत असतो. त्यामुळे प्रवासाची ओढ व प्रवृत्ती मानवास उपजतच असते. व ती छंद रूप घेते. तो छंद पद्धतशीरपणे व जाणीवपूर्वक जोपासणे आवश्यक असतें. ज्याला प्रवासाची आवड नाही असं मनुष्य विरळाच. कारण असं मनुष्य आपले जीवन समृध्द, खर्‍या अर्थाने सार्थक करत नाही म्हणूनच प्रवासास जीवनातील तीन महागुरूंमध्ये प्रथम स्थान आहे. तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे तीन महागुरू होत. प्रवासास शिक्षणापेक्षाही उच्च स्थान आहे कारण जे काम शंभर व्याख्याने करणार नाहीत ते एक प्रवास शिकवून जातो.
प्रवास करणारे दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे हौस म्हणून प्रवास करणारे व दुसरे प्रवासाची हौस असणारे.
यातील पहिल्या प्रकारचे लोक हे केवळ प्रवास करतात. आराम किंवा मजा म्हणूनच ते प्रवास करतात. अशा लोकांना स्वशिक्षण आणि अनुभव मिळत नाही. एवढेच नाही तर यांनी जी सौदर्य स्थळे व ठिकाणे पाहिलेली असतात, ती यांच्या लक्षात येत नाहीत, रहात नाहीत. हे लोक अनेक छोटी पण महत्वाची स्थाने पाहण्याचे टाळतात. ते अज्ञानातच सुख मानतात. यांना प्रवासापेक्षा राहण्याची व्यवस्था, जेवणाचे, खाण्या पिण्याचे महत्व जास्त महत्वाचे वाटते.

प्रवासाची हौस असलेले लोक हे आपल्या प्रवासाचे आयोजन व नियोजन स्वतः करतात. ते व्यवहारी असतात. प्रवासाने त्यांचे अनुभव विश्व वाढलेले असते. पण सर्व प्रवास संपवून परत आल्यावर बडा मजा आया अशा समाधानात त्यांचा प्रवास संपतो. मात्र आमचं सगळ बघून झालाय असं ते सहसा म्हणत नाहीत. ते आता न पाहिलेल्या ठिकाणांची यादी तयार करतात. त्यांचा प्रवास समुद्रांच्या लाटांसारखा आपल्या आठवणींची साठवण फार काल मागे सोडून जात असतो. त्यांच्या कार्यशक्ती, विचारशक्ती, सहन शक्ती, स्व व्यवस्थापन कौशल्य यामध्ये वाढ झालेली असते. मुळात प्रवास का करावा? पुस्तकांसारखा किंबहुना त्यापेक्षा अधिक समृद्ध अनुभव प्रवासामुळे मिळतो. पुस्तकं गुरू आहेतच. पण अनुभव घ्यायचा झाला तर भटकंती, फिरण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. मग प्रश्‍न येतो की कुठे फिरायचं? आपल्याला फिरणं म्हटलं की अमेरिका, स्वित्झर्लंड, दुबई, लंडन, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका हे पाश्‍चात्य पौर्वात्य देश म्हणजे थोडक्यात परदेश आठवतात. आपण आपल्या भारतभूमीवर कधी संपूर्ण फिरून आलोय का हो?
आपल्याकडे केरळ, आसाम, गोवा, काश्मीर, गुजरात, राजस्थान अशी विविध राज्ये आहेत. त्या त्या राज्यांची विविध संस्कृती आहे, भाषा आहे, पेहराव आहे, पदार्थ आहेत. खरं तर एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाताना अचानक कन्नड भाषेतून तमिळ भाषा कधी सुरू होते ते कळतही नाही. कुर्ता पायजमा जाऊन अंगावर लुंगी आणि सदरा कधी येतो ते लक्षातच येत नाही. पिठलं आणि भाकरी खाता खाता इडली डोसा कधी घशात गेला ते समजतही नाही.

मात्र ही मजा लुटण्यासाठी आपण घराबाहेर पडलं पाहिजे. आपल्या भारत देशाचा इतिहास, संस्कृती फार मोठी आहे. या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी देश फिरणं गरजेचं आहे.
या भटकंतीचा महत्त्वाचा एक फायदा होतो तो म्हणजे आपल्याला शिस्त लागते. स्वयंशिस्त लागते. एरवी घरात आईच्या प्रत्येक हाकेला, दोन मिनिटांत उठतो असं उत्तर देत उठायला अर्धा-अर्धा तास लावणारेही गाडी निघून जाईल या भीतीनं कोणीही हाक न मारताच पहाटेच उठून तयार होतात. अंथरुणात रेंगाळत पडत नाहीत. पटकन आपली आवराआवर करून तयार होतात. ही महत्त्वाची शिस्त आपल्याला लागते. आपली कामं लवकर उरकण्याची सवय लागतेच शिवाय सर्व वस्तू जागच्याजागी ठेवण्याची, सामान सांभाळून ठेवण्याची, न हरवण्याची, जपून वापरण्याची सवय लागते. अर्थात याच सवयी आपल्याला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडतात.
अशा ये देशाटनातून अंगी बाणणारा आणखी एक गुण म्हणजे स्वावलंबन. शाळेत जाताना डबा-पाण्याची बाटली भरून देण्यापासून ते बुटाची लेस बांधण्यापर्यंत आई-बाबा सगळी कामं करतात. त्यामुळे आपली कामं आपण स्वतः करण्याची सवय नसते. जेवण झाल्यावर आपलं ताट उचलून ठेवणं, आपल्या अंथरूण-पांघरुणाची घडी घालणं, या गोष्टीसुद्धा अनेकांना अवघड जातात. याच गोष्टींची सवय असल्या या भटकंतीतून आपल्याला सहज होते. समोर येईल ते खाण्याची सवय अशा भटकंतीतून होते. केवळ घरचेच पदार्थ खाण्याची सवय असल्यामुळे बाहेरील विविध पदार्थांची चवही यानिमित्ताने चाखता येते. नावडती भाजी किंवा आपल्याला घरात नको असलेले पण शरीराला आवश्यक असे पदार्थ खाण्याची सवय बिनबोभाट लागून जाते. यामुळे आपल्या खाद्यज्ञानात तर कमालीची भर पडत जाते. त्या त्या भागातील विशिष्ट पदार्थ कोणता आहे याची आपल्याला त्यामुळे जाणीव होते. एकटं फिरण्याची सवय होते. अनेक लोकांचा सहवास आपल्याला मिळतो.

आपण पुस्तकातून विविध प्रदेश फक्त वाचलेले ऐकतात. कोकण किंवा गोव्यातील नारळी-पोफळींच्या बागा कवितेतून गुणगुणत असतो. पण प्रत्यक्ष त्यांचा अनुभव आणि सौंदर्य जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी पाठीमागे बॅग लावून कोकण गोव्याचा प्रवास करावा लागेल. कोकणातील लाल रस्ते, अर्धा एक तास बसची वाट पहाणं, बस नाहीच आली तर पायी चालत जाणं या अशा गोष्टीमुळे आपल्याला ‘संयम’ म्हणजे काय याची जाणीव होते. आज कोणतीही गोष्ट झटपट मिळण्याची आपल्याला सवय झालेली असल्यामुळे आपण संयम गमावत चाललेलो आहोत. हा संयम जर आपल्याला परत मिळवायचा असेल तर अशा खेड्यात जाणं हे सर्वात इष्ट आहे.

त्या त्या भागातील भाषा, तेथील पेहराव, तेथील परंपरा, तेथील संस्कृती, तेथील राहणीमान अशा सर्वांचा आपल्याला अनुभव मिळतो. राजस्थानच्या वाळवंटात लोक कसे रहात असतील हा विचार केवळ आपल्या घरात बसून करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष तिथे जाऊनच तो अनुभव घ्यावा. जम्मू काश्मीरमधील लोक कसे जगत असतील हे अनुभवण्यासाठी तेथे किमान आठ दिवस जाऊन राहिल्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती कळून येईल. मीडियामध्ये वर्णन करतात तशीच भयानक परिस्थिती तिथे आहे की नाही याचा याची देही याची डोळा अनुभव आपल्याला घेता येईल. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून हिंडण्यासाठी महाराष्ट्रातील गड आणि किल्ले पायाखाली घातले पाहिजेत.

आसाममधील चहाचे मळे, हिमालयातील बर्फाच्छादित डोंगर, गुजरातमधील विकास, उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील गरिबी, मुंबईतील झोपडपट्टी बेंगलोरमधील वैज्ञानिकता कितीतरी नानाविध गोष्टी आपल्याच भारत देशात आहेत. त्यामुळे देशाटन म्हटल्यावर केवळ परदेशगमन हे आपण डोक्यातून काढून आपल्या भारत भूमीवरील भाग जरी फिरून आलो तरी कितीतरी गोष्टींचा अनुभव आपल्याला सहज मिळेल. आणि अशा या देशाटनामुळे, भटकंतीमुळे आपलं जीवन अधिक समृद्ध आणि संपन्न होण्यास नक्की मदत होईल.