अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अपेक्षेनुरूप दिल्लीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकवार झाडले आहे. मतदारांनी पुन्हा एकवार केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाच्या जनताभिमुख कामगिरीला जोरदार पाठबळ दर्शवलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सारी भिस्त केवळ नरेंद्र मोदींवर राहिली होती. केंद्रातील मोदी सरकारच्या काश्मीर, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राममंदिर, आदी कामगिरीवर भर देत ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर व्हावी असा आटोकाट प्रयत्न भाजपाने दिल्लीत करून पाहिला, परंतु केजरीवाल यांच्या प्रचाराचा सारा भर केवळ स्वतःच्या सरकारच्या कामगिरीवर, गेल्या पाच वर्षांत दिलेल्या सुशासनावर राहिला होता, तो त्यांनी हटू दिला नाही. वीस हजार लीटरपेक्षा कमी वापर केल्यास मोफत पाणी, दोनशे युनीटपेक्षा कमी वापर असल्यास मोफत वीज, सरकारी इस्पितळांत मोफत औषधे, सरकारी इस्पितळांत उपचार उपलब्ध नसल्यास खासगी इस्पितळांत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, विविध प्रभागांमध्ये मोहल्ला क्लिनिक्स, सरकारी शाळांचा सुधारलेला दर्जा, खासगी शाळांना फी वाढ करण्यास केलेला प्रतिबंध, महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास अशा नानाविध सोयीसुविधांमधून केजरीवाल सरकारने गरीब व मध्यमवर्गीय मतदारांना आपलेसे केले होते. काही केल्या त्यांना प्रचाराची दिशा बदलू द्यायची नव्हती. ‘‘दिल्लीत हिंडता फिरताना सर्वसामान्य माणसे, टॅक्सीवाले, फेरीवाले, दुकानदार, व्यावसायिक आप सरकारच्या या कामगिरीचे कौतुक करताना सर्रास दिसतात. भाजपने बड्या लोकांकडेच लक्ष दिल्याची तक्रार असते.’’असे प्रत्यक्ष निरीक्षण आम्ही ताज्या दिल्ली भेटीनंतर २२ जानेवारीच्या अग्रलेखात नोंदवले होते. कालचा निकाल त्याचीच साक्ष देतो आहे. केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षांत जोडलेल्या मतदाराने त्यांना या निवडणुकीत पुन्हा एकवार भरघोस पाठिंबा दिलेला आहे. केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा, त्याच्या विरोधातील जामा मशीद किंवा जामियॉं विद्यापीठातील आंदोलन शाहीनबाग आंदोलन यासारखे व्यत्यय येऊनही ‘आप’ने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा भरकटू दिली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जंग जंग पछाडले, तरी केजरीवालांच्या ‘आप’ला पिछाडीवर टाकणे त्यांना शक्य झालेले नाही. ‘अच्छे बीते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ हे विशाल दादलानींनी आपसाठी बनवलेल्या प्रचारगीताचे शब्द होते. हे ‘लगे रहो केजरीवाल’ दिल्लीत सतत गुंजत राहिले. सामान्यांच्या मनाला साद घालत राहिले. पुढील पाच वर्षांसाठी जेव्हा इतरांप्रमाणे केवळ जाहीरनामे घेऊन न येता केजरीवाल ‘गॅरंटी कार्ड’घेऊन आले, तेव्हा भाजपला ही निवडणूक यावेळीही जड जाणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते. मतदानोत्तर पाहण्यांनीही त्याला दुजोरा दिला. भाजपने या निवडणुकीत प्रचंड ताकद वापरली. काही नेत्यांनी तर आक्रमक आणि आक्रस्ताळ्या वक्तव्यांनी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु केजरीवाल यांनी त्यालाही भीक घातली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणेही यावेळी त्यांनी टाळले. नागरिकत्व कायदा दुरुस्ती अथवा शाहीनबाग आंदोलनापासूनही ते कटाक्षाने दूर राहिले. उलट ‘हनुमान चालिसा’ पठण करीत आपला हिंदू चेहरा केजरीवाल यांनी जनतेपुढे ठेवला. आम आदमी पक्षाचा ‘अरविंद केजरीवाल’ हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता. याउलट भाजपापाशी मुख्यमंत्रिपदाचा असा चेहराच नव्हता. याउलट आम आदमी पक्षाने ही निवडणूक जणू अध्यक्षीय निवडणूक असल्याच्या थाटात केजरीवाल यांच्या भोवती लढवली. त्यांनी या निवडणुकीची सज्जता आधीपासून सुरू ठेवली होती. घरोघरी संपर्क, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, प्रशांत किशोर यांच्या व्यावसायिक सल्लागार सेवेची मदत, केजरीवाल या ब्रँडची निर्मिती या सगळ्यांत आपने यावेळी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. निवडणुकीत त्यांनी २३ मतदारसंघांमध्ये नवे चेहरे उतरवले होते. कटाक्षाने जपलेली आपली स्वच्छ प्रतिमा आणि आपल्या सरकारची चौफेर कामगिरी यातून त्यांनी हे देदीप्यमान यश मिळवले आहे. भाजपाने किमान काही जागांची भर घातली, परंतु कॉंग्रेसच्या वाट्याला पुन्हा एकवार दारुण अपयश आले आहे. शाहीनबाग आंदोलनाला दिलेला पाठिंबा, मोदींची नथुरामशी केलेली तुलना असे राहुल – प्रियांकांचे स्वयंगोल कॉंग्रेसला महाग पडले आहेत. कॉंग्रेससाठी ही कामगिरी लाजिरवाणी आहे आणि भाजपसाठी हा निकाल म्हणजे धडा आहे. राज्यांच्या निवडणुका मोदींच्या कामगिरीवर जिंकता येणार नाहीत. त्यासाठी राज्यात काम हवे हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. आम आदमी पक्षाने केलेली ही हॅटट्रीक आता त्या पक्षाला राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होण्याचा आत्मविश्वास मिळवून देईल. कॉंग्रेस तर सतत स्वतःच्याच चुकांनी गाळात चालली आहे. मतदारांना भावनिक मुद्द्यांत गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष अनुभवता येईल असे काम करून दाखवण्याची गरज असते हेच हा निकाल आज जणू कंठरवाने सांगतो आहे.