केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वातील 20 सदस्यांचे पथक चौकशी करणार आहे. या घटनेत जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 3 झाली आहे. या बॉम्बस्फोटात एका 12 वर्षीय मुलगी जखमी झाली होती, तिचा रात्री उशिरा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. यापैकी 12 जण आयसीयूमध्ये, तर 3 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 50 ते 60 टक्के भाजलेल्या 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.