केरळ, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील प्रलयंकारी पावसाने आतापर्यंत १५७ बळी घेतल्याचे वृत्त आहे. एकट्या केरळमधील बळींची संख्या ६७ वर गेली असून २.२७ लाख लोकांना मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे.
दरम्यान हवामान खात्याने केरळमधील कन्नूर, कासरगोड व वायनाड या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा अतीवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. कॉंगे्रस नेते तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल वायनाड जिल्ह्याचा दौरा करून तेथील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली.
दक्षिण रेल्वे प्रशासनाने पूरस्थितीमुळे काल १० ट्रेन पूर्णपणे रद्द केल्या. तर सात ट्रेन अंशत: रद्द केल्या. राज्यात लष्कर, नौदल, तटरक्षक दल यासह अन्य अनेक आपत्कालीन सेवा यंत्रणा मदत कार्यात जुंपल्या आहेत.
कर्नाटकात ३१ बळी
भीषण पुरामुळे कर्नाटकात बळी गेलेल्यांची संख्या ३१वर गेली आहे. तसेच ३.१४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
अमित शहा यांच्याकडून
कर्नाटकात पाहणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कर्नाटकच्या काही पूरग्रस्त भागांची लष्कराच्या विमानातून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी होते.
महाराष्ट्रात ३० बळी
महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून तेथील बळींची संख्या ३० झाली आहे. सुमारे ४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. सांगली येथील नदीत होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत एकाच वेळी १७ जणांचे बळी गेले.
कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातल्याने परिस्थिती बिकट झाली.
कोल्हापुरातील काही भागांमध्ये पीडित लोकांना हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटे वितरीत करावी लागली. हे लोक पूर्णपणे पाण्याने वेढले गेल्याने त्यांच्यापर्यंत पोचणे शक्य नव्हते.