>> दोघांचा मृत्यू, 52 जखमी, जखमींत 7 गंभीर
>> संशयिताचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल केवळ 20 मिनिटांत तीन साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 52 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
कलामासेरी येथील तीन स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या स्फोटानंतर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून मुंबई, पुण्यासह दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरात ज्यूंची धार्मिक स्थळे असलेल्या भागात उच्चस्तरीय सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. रुग्णालयांना पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.
तपास सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणाहून अनेक स्फोट झाल्याची माहिती मिळाली. सकाळी 9 च्या सुमारास हे स्फोट झाले होते. त्यानंतर हॉल सील करण्यात आला व होता आणि केरळ पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास काम सुरू करण्यात आले आहे. या तपासात असे दिसून आले आहे की, स्फोट घडवण्यासाठी टिफिन बॉक्समध्ये ठेवलेले इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) वापरण्यात आले होते. ज्याद्वारे हे स्फोट घडवण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरच्या हॉलमध्ये एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. स्फोट झाला तेव्हा घटनास्थळी 2000 हून अधिक लोक उपस्थित होते आणि सर्वजण प्रार्थना करत होते. केरळ पोलिसांना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाल्याचे फोनद्वारे सांगण्यात आले. 15 मिनिटांच्या अंतरानंतर दुसरा स्फोट झाला. दोन स्फोटानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. स्फोटामुळे तिथेही आग लागली. लोक स्वतःला वाचवण्यासाठी धावू लागले. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने तिसरा स्फोट झाला. पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या.हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
आज सर्वपक्षीय बैठक
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलावली तसेच या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी तिरुवनंतपुरममध्ये आज सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबई, दिल्लीत हायअलर्ट
केरळमध्ये काल झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. केरळमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह, पुणे आणि दिल्लीतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संशयित आरोपीचे आत्मसमर्पण
या स्फोटाची जबाबदारी कोचीच्या डॉम्निक मार्टीन या रहिवाशाने स्वीकारली असून त्याने त्रिशूर पोलीस स्थानकामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. संबंधित मार्टीन याने स्वतःहून पोलीस स्थानकात दाखल होत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याने आपण बॉम्ब ठेवला असल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. केरळमधील या स्फोटांनंतर काही तासांत त्याने आत्मसमर्पण केले. सदर स्फोटापूर्वी डॉम्निक याने फेसबुक लाईव्ह करून स्फोटामागील कारणही स्पष्ट केले होते. त्यात त्याने मा ख्रिश्चन धर्माच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणीशी सहमत नाही, जरी मी त्यांच्यापैकी एक आहे, परंतु त्यांची विचारधारा धोकादायक आहे. ते लोक देशातील तरुणांच्या मनात विष कालवत असल्यामुळे हा बॉम्बस्फोट केल्याचे म्हटले आहे. फेसबुक लाईव्हमध्येच त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले आहे.
दहशतीसाठी बॉम्बस्फोट
केरळमधील साखळी बॉम्बस्फोट हा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे सूत्रांनीसांगितले. कोची येथील राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे चार सदस्यीय पथक घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले.