केरळमध्ये बार बंद करणार

0
105

मद्य फक्त पंचतारांकित हॉटेलांत
सर्व रविवार ‘ड्राय डे’
केवळ पंचतारांकित हॉटेलांत मद्य उपलब्ध करण्याच्या व इतर सर्व बार बंद करण्याचे धोरण केरळ सरकारने काल मंजूर केले. यामुळे हॉटेलना जोडलेले सुमारे ७०० बार बंद करण्यात येणार आहेत. शिवाय दारुवर अतिरिक्त पाच टक्के अधिभार लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. येत्या दहा वर्षांपर्यंत केरळ राज्य दारू मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
काल याबाबत मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शिवाय २ ऑक्टोबरपासून सर्व रविवार ‘ड्राय डे’ करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. दरम्यान, या आधीपासून प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस ‘ड्राय डे’ पाळण्यात येतो.
दरम्यान, बेवरेजीस कॉर्पोरेशनच्या दालनांतून विकण्यात येणार्‍या मद्यावर अतिरिक्त ५ टक्के अधिभार लावण्यात येणार असून त्यातून आलेली रक्कम बार बंद झाल्याने रोजगार गमावलेल्यांच्या पुनर्वसनासाठी व दारुबंदीच्या जागृतीकरिता वापरण्यात येईल.
सरकारने परवान्यांचे नूतनीकरण न केल्याने यापूर्वीच ४१८ बार बंद झाले असून ३१२ बार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत बंद केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.