केरळच्या 22 वर्षीय ब्रेन डेड तरुणामुळे तिघांना जीवनदान

0
0

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये काल एका 22 वर्षीय तरुणाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी त्या ब्रेन डेड तरुणाच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले. या ब्रेन डेड तरुणाचे मूत्रपिंड गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रतीक्षा यादीतील 33 वर्षीय आणि 24 वर्षीय पुरुष रुग्णांना देण्यात आले. औरंगाबाद येथील एमजीएम इस्पितळातील रुग्णाला यकृत देण्यात आले. दरम्यान, राज्यात चालू वर्षात आत्तापर्यत तीन ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवांचे दान करण्यात आले असून, 11 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

मोपा विमानतळावर काम करणाऱ्या मूळ केरळ येथील 22 वर्षीय तरुणाला एका अपघातात डोक्याला जबर जखम झाली होती. त्याला उपचारार्थ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. इस्पितळातील अतिदक्षता विभागात त्या तरुणावर पाच ते सहा दिवस उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती ठीक होत नसल्याने आढळून आल्यानंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. जीएमसीच्या न्यूरोलॉजी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. सनत भाटकर आणि जीएमसीच्या साहाय्यक प्राध्यापक जनरल मेडिसिन डॉ. मरिना वाझ यांनी ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेशन केले.

इस्पितळातील डॉक्टरांनी त्या ब्रेन डेड तरुणाच्या कुटुंबीयांना अवयव दानाची विनंती केली. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयव दानास संमती दिली, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. अवयव दानासाठी अपार धैर्य आणि औदार्य आवश्यक आहे. दु:खाच्या काळात अवयवदानास होकार दिल्याबद्दल दात्या कुटुंबाचे मी आभार मानतो, असे बांदेकर यांनी म्हटले आहे.

‘सोट्टो गोवा’कडून आठवे अवयवदान

‘सोट्टो गोवा’च्या छत्राखालील हे आठवे अवयवदान आहे. वर्ष 2019 पासून सोट्टोने 16 मूत्रपिंडांचे वाटप केले आहे. रोट्टो पश्चिम आणि नोट्टोद्वारे 4 हृदय, 7 यकृत आणि 2 फुप्फुसांचे वाटप केले आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले. अवयव दान केलेल्या त्या तरुणाचे शव अंत्यसंस्कारासाठी केरळ राज्यातील मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे, असेही गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.