केपेत बरसल्या जोरदार मान्सूनपूर्व सरी

0
5

>> 4.7 पावसाची नोंद; दक्षिण गोव्यातील अनेक भागात जोर‘धार’

दक्षिण गोव्यातील केपे, सांगे, मडगाव या भागात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस सोमवारी रात्री उशिरा जोरदार पाऊस पडला. चोवीस तासांत केपे येथे सर्वाधिक 4.7 इंच मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली. सांगे येथे 1.1 इंच आणि मडगाव येथे 1 इंच पावसाची नोंद झाली. राज्यभरात सुमारे 0.66 इंच पावसाची नोंद झालेी. तसेच, दाबोळी, काणकोण, फोंडा, साखळी, पणजी, म्हापसा, पेडणे, जुने गोवे येथे काही प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने या वर्षी मोसमी पावसाचे आगमन चार दिवस उशिराने होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण सुध्दा कमीच आहे. राज्यात उष्णतेच्या प्रमाणात खूप वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण बनलेले आहे. तथापि, हवामान विभागाने आगामी चार दिवसांसाठी कोणताही इशारा दिलेला नाही.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईच्या समस्या उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील धरणातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. तथापि, जलस्रोत विभागाकडून 15 जूनपर्यंत पुरण्याएवढे पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे.

राज्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. दक्षिण गोव्यात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली धरणामध्ये 25 टक्के पाण्याचा साठा आहे. सत्तरी, डिचोली भागात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या अंजुणे धरणामध्ये 10 टक्के पाण्याचा साठा आहे. डिचोली तालुक्यातील आमठाणे धरणामध्ये 53 टक्के पाणी आहे. काणकोण तालुक्यातील चापोली धरणामध्ये 45 टक्के आणि गावणे धरणामध्ये 41 टक्के पाणी आहे. तिसवाडी, फोंडा तालुक्यात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ओपा पाणी प्रकल्पातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी गांजे येथून पाणी खेचून खांडेपार नदीत सोडले जात आहे.