>> महिलांशी साधणार संवाद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चालू महिन्याच्या अखेरपर्यंत परत एकदा गोव्यातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत, असे आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी काल सांगितले.
यावेळी ते राज्यातील महिला वर्गाशी संवाद साधणार असून खाणपट्ट्यात जाऊन खाणग्रस्त, खाण अवलंबित, खाणपट्ट्यातील बिगर सरकारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून खाणींचा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. महिलांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केजरीवाल करणार असल्याचे नाईक म्हणाले. खाणपट्ट्यात ते खनिजवाहू ट्रकांचे मालक, बार्ज मालक यांच्याशी तसेच खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत. दरम्यान, राज्यातील अंमली पदार्थ व्यवहार ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे याची कल्पना केजरीवाल यांना असून ही समस्याही ते या भेटीत सविस्तरपणे जाणून घेणार आहेत. अमली पदार्थांमुळे राज्यात गुन्हेगारी कशी वाढली आहे, माफियांचा शिरकाव कसा झाला आहे, युवा वर्गाला अमली पदार्थांचे व्यसन कसे लागले आहे हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पर्यटन फोफावलेल्या राज्यात अमली पदार्थ असतातच असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जे विधान केलेले आहे ते केजरीवाल यांना मान्य नसल्याचे नाईक म्हणाले.