केजरीवाल दोन दिवसांनी देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

0
10

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर काल त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आपण दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीमामा देणार असल्याचे सांगितले. आम आदमी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली. दिल्लीतील विधानसभा निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. मात्र महाराष्ट्रासोबत ही निवडणूक घ्यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली. जोपर्यंत निवडणूक होणार नाही तोपर्यंत आपकडून इतर नेत्यांकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाईल असेही केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

केजरीवाल यांनी, आमचे नेते सत्येंद्र जैन आणि अमानतुल्ला खान अजूनही तुरुंगात आहेत. आशा आहे की ते लवकरच बाहेर येतील. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेण्याची परवानगी दिली जात होती, पण माझ्या पक्षाच्या सहकाऱी संदीप पाठक यांना भेटण्याची मला परवानगी दिली नसल्याचे म्हटले.

हे उशिरा सुचलेले शहाणपण ः हजारे
केजरीवाल यांनी राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेले शहाणपण असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र अण्णा हजारे यांनी आपण केजरीवाल यांना सुरुवातीपासून समाजसेवा करा. आपण खूप पुढे जाल असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले. असल्याचे म्हटले आहे.