केजरीवालांच्या कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

0
11

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत काल 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. या प्रकरणात केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. काल त्यांची ईडी कोठडी संपली होती. यानंतर केजरीवाल यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली.

अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात काल स्वत:च आपली बाजू मांडली. असे करणारे ते देशातील पहिले विद्यमान मुख्यमंत्री ठरले. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला.
केजरीवाल यांनी बाजू मांडल्यानंतर ईडीने स्पष्टीकरण देत केजरीवाल यांच्या कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्याची मागणी केली; मात्र न्यायालयाने ही मागणी मान्य न करता त्यांच्या कोठडीत केवळ 4 दिवसांची वाढ केली. त्यांना आता 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत राहावे लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी अटक व कोठडी विरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे, त्यावर न्यायालयाने ईडीला 2 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर पुढील सुनावणी 3 एप्रिलला होणार आहे.
अटकेसाठी 4 विधाने पुरेशी
आहेत का? : केजरीवाल
या प्रकरणात माझे नाव फक्त चार ठिकाणी आले आहे. चार जबाब देण्यात आले आणि त्या आधारे मला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे विधान केजरीवाल यांनी न्यायालयासमोर केले. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी ही 4 विधाने पुरेशी आहेत का? असेही आपल्या अटकेचा निषेध करत अरविंद केजरीवाल म्हणाले. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री कायद्याच्या वर नाहीत, असे ईडीने म्हटले.