केजरीवालांच्या अटकेचा इंडिया आघाडीकडून निषेध

0
16

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेचा इंडिया आघाडीतर्फे येथील आझाद मैदानावर काल निषेध करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार ॲल्टन डिकॉस्टा, आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जुझे फिलीप डिसोझा, शिवसेनेचे (ठाकरे गट) जितेश कामत व इतर उपस्थित होते.
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर जाणाऱ्या इंडिया आघाडीच्या समर्थकांना सुरुवातीला पोलिसांनी अडविले. यावेळी इंडिया आघाडीचे समर्थक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. स्थानिक प्रशासनाने इंडिया आघाडीच्या समर्थकांना आझाद मैदानावर जाण्यास मान्यता दिल्यानंतर त्यांना मैदानावर प्रवेश देण्यात आला.

भाजप सरकारकडून सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका युरी आलेमाव यांनी केली. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनंतर केजरीवाल यांना निवडणूक काळात अटक करून विरोधी इंडिया आघाडीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, असेही आलेमाव म्हणाले.

विरोधी इंडिया आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधातील नेत्यांना अटक केली जाते किंवा अटकेची धमकी देऊन आपल्या पक्षात सहभागी होण्यास भाग पाडले जाते. गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येणारे नेते भाजपकडे गेल्यावर शुद्ध होतात, असे ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनू नये. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.