केजरीवालांच्या अटकेचा आप, काँग्रेस, आरजीपीकडून निषेध

0
8

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून, राज्यातील आप, काँग्रेस, आरजीपी या विरोधी पक्षांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी केजरीवाल यांना अटक केल्याचा आरोप सदर पक्षांनी केला.

देशातील लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरण पुढे करून अटक केली आहे, अशी टीका आपचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केली.
भाजपने केजरीवाल यांना अटक करून निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना कमकुवत करून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली.

भाजपने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी केली.
भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अटक करून एकाधिकारशाहीचे दर्शन घडविले आहे, असे रेव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी म्हटले आहे.

सदानंद शेट तानावडे काय म्हणाले?
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक करताना आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेचा लोकसभा निवडणुकीशी काही संबंध नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना सीबीआयने इफ्फी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. पर्रीकर यांनी सीबीआयसमोर उपस्थिती लावून सहकार्य केले होते, तर केजरीवाल यांनी ईडीचे समन्सना दाद दिली नाही. त्यामुळेच त्यांना अटक करावी लागली, असेही तानावडे म्हणाले.