केकेआरसमोर राजस्थान ‘लिन’

0
115

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी व ३७ चेंडू राखून पराभव करत इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील आपली विजयी दौड कायम राखली. स्टीव स्मिथच्या नाबाद ७३ धावांनंतरही राजस्थानचा डाव १३९ धावांत रोखताना केकेआरने विजयी लक्ष्य अवघ्या १३.५ षटकांत गाठले.

कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांना खेळपट्टीशी जुळवून घेता आले नाही. अजिंक्य रहाणे स्वस्तात परतल्यानंतर जोस बटलर व स्मिथ यांना धावा जमवण्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. पहिल्या दहा षटकात राजस्थानच्या केवळ ५६ धावा झाल्या होत्या. बटलर मोठी खेळी करण्यासाठी सज्ज झालाय असे वाटत असताना हॅरी गर्नीने त्याचा काटा काढला. स्मिथने यानंतर लहानमोठे फटके खेळत धावा जमवल्या.

परंतु, केकेआरच्या बलाढ्य फलंदाजी फळीसमोर आव्हान निर्माण करणारी धावसंख्या त्यांना रचता आली नाही. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नारायण (२५ चेंडूंत ४७) व ख्रिस लिन (३२ चेंडूंत ५०) यांनी केकेआरला ८.३ षटकांत ९१ धावांची वेगवान सलामी देत राजस्थानच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. लेगस्पिनर गोपाळने या द्वयीला बाद करेपर्यंत सामना राजस्थानच्या हातातून निसटला होता. उथप्पा (२६) व गिल (६) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.