इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील २९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा डोस पाजला. विजयासाठी आरसीबीने समोर ठेवलेले १७६ धावांचे लक्ष्य केकेआरने ५ चेंडू व ६ गडी राखून गाठले.
धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून सुनील नारायणने आपल्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. त्याने १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २७ धावा जमवून ख्रिस लिन ( नाबाद ६२) याच्यासह ५९ धावांची सलामी दिली. पाठदुखीमुळे नितीश राणा (१५) याने मैदान सोडले तर आंद्रे रसेल शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार कार्तिकने १० चेंडूंत २३ धावा कुटल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ लांबला.
तत्पूर्वी, पावसाची शक्यता लक्षात घेऊन कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक (२९) व ब्रेंडन मॅक्कलम (३८) यांनी आरसीबीला ६७ धावांची सलामी दिली. कर्णधार विराट कोहलीने ४४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६८ धावा जमवल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने ३ तर कुलदीप यादवने १ गडी बाद केला. आरसीबीने या सामन्यासाठी तीन बदल करताना तापाने आजारी असलेल्या एबी डीव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर व पवन नेगी यांना वगळून टिम साऊथी, मुरुगन अश्विन व मनन वोहरा यांना संधी दिली. आज चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात पुणे येथे सामना खेळविला जाणार आहे.