नितीन गडकरी, सीतारामन, हेपतुल्ला यांना नकार
देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत सातत्याने विदेश दौरे केलेल्या नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या काही सहकारी मंत्र्यांच्या विदेश दौर्यांना विरोध केला आहे. या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.अमेरिका, ऑस्ट्रेलियासह लहान-मोठ्या अन्य काही देशांचे दौरे करीत राहिल्याने पंतप्रधान मोदी विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य ठरले होते. लालू प्रसाद यादव यांनी त्यांना एनआरआय पंतप्रधान असेही संबोधले होते. मात्र आता मोदी यांनी नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, नजमा हेपतुल्ला यांच्या विदेश वार्यांवर संक्रांत आणल्याचे वृत्त आहे. यामुळे अन्य ११ मंत्र्यांनाही आपले विदेश दौरे रद्द करावे लागले आहेत. परिणामी मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये गांेंधळयुक्त नाराजी पसरल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांच्या भूमिकेबद्दल आश्चर्यही व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या दोन दिवसीय बैठकीसाठी बँकॉकला जाण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठविला होता. तर व्ही. के. सिंग यांच्याकडून विदेशवारीचे तब्बल १२ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र पंतप्रधानांनी या दोघांचेही प्रस्ताव नाकारले. विदेश दौर्यांबाबत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर मात्र सुदैवी ठरले. गेल्या ९ ते १२ डिसेंबर दरम्यानच्या हवामानविषयक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लिमा व पेरू येथे जाण्यास त्यांना मान्यता देण्यात आली.