>> स्टार प्रचारक यादीतून वगळण्याचे आदेश
निवडणूक आयोगाने काल केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर व भाजपचे खासदार परवेश वर्मा यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारक म्हणून यादीतून काढून टाकण्यात यावे असा आदेश जारी केला. सध्याच्या निवडणूक प्रचार सभांमध्ये वादग्रस्त व प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी या नेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.
उभय नेत्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. ठाकूर व वर्मा अजूनही दिल्लीतील निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतात. मात्र प्रचार मोहिमेच्या खर्चाचा भार त्यांना उचलावा लागेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. अनुराग ठाकूर यांनी एका प्रचार सभेवेळी ‘देश के गद्दारोंको. गोली मारो ुु को’ अशी घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांकडून करून घेतली होती.
भाजपचे पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांनी शाहीन बागमधील हजारो सीएए विरोधक दिल्लीतील लोकांच्या घरांमध्ये घुसून घरातील लोकांना मारून टाकतील व महिलांवर बलात्कार करतील असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. वर्मा यांनाही निवडणूक आयोगाने त्यासाठी नोटीस जारी केली होती.