>> नितीन गडकरींनी दिले संकेत
राज्यात नवीन रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा या विकासाच्या मुद्द्यांवर भाजप येती विधानसभा निवडणूक लढविणार असून निवडणुकीनंतर नवनिर्वाचित आमदार मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करतील किंवा आमदारांच्या मतांनुसार एखादा केंद्रातील नेता मुख्यमंत्री म्हणून गोव्यात पाठविणे असे दोन्ही पर्याय भाजपच्या संसदीय
मंडळाने ठेवले आहेत, असे गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट शब्दांत सांगितले. याद्वारे विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनाच मुख्यमंत्रिपदासाठी गोव्यात पाठविण्याचे संकेत गडकरी यांनी दिले. गोव्यात पाठविण्यात येणारा नेता आमदार असो किंवा नसो, असेही ते म्हणाले. त्यावर पर्रीकर यांचे केंद्रातील कार्य संपले काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, आपल्या मनातील भावना काहींना कळल्या, असे ते उद्गारले. या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर नवा नेता कुणीही असू शकेल, कदाचित पार्सेकरही असू शकतील किंवा एखादा निवडून आलेला अन्य आमदारही असू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वासही श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. गेल्या पावणेपाच वर्षांच्या काळात केंद्राने गोव्याला अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दिला.
रस्त्यांचे जाळे विणले, जुवारी नदीवरील नव्या आधुनिक पुलाचे कामही सुरू झाले आहे. हा पूल जगाचे आकर्षण ठरेल, असे ते म्हणाले. रस्ते, पूल मिळून राज्यात केंद्रातर्ङ्गे सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांची कामे चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री सुदिन ढवळीकर हे आपले मित्र आहेत. राजकारण वेगळे व मैत्री वेगळी असते, असे सांगून कदाचित ढवळीकर यांना स्वतंत्र निवडणूक लढविल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळेल असे वाटले असावे, त्यामुळेच त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा, असे गडकरी यांनी एका प्रश्नावर सांगितले. निवडणुकीनंतर भाजप-मगो युती होण्याची शक्यता आहे काय, असा प्रश्न केला असता, राजकारणात काहीही शक्य असते, असे सांगून नंतरही गरज भासल्यास भाजप-मगो युती होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.