पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी उत्तर प्रदेश केडरचे परूल गुप्ता यांची नियुक्ती केली असून काल त्यांचे गोव्यात आगमन झाले.उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ असून दि. २८ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ३० जानेवारी आहे. गरज भासल्यास दि. १३ रोजी मतदान होईल. दि. १८ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पणजी मतदारसंघाच्या निवडणूकीपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरल्याने मतमोजणीच्या बाबतीत प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे.
पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी दिल्लीतील निवडणुकीची मतमोजणी करू नये, अशी भाजप वगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांची मागणी आहे. येथील निवडणूक अधिकार्यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंबंधिची माहिती दिली आहे. परंतु अद्याप निवडणूक आयोगाने सध्याच्या कार्यक्रमात बदल केलेला नाही.
दरम्यान कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो दि. २१ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.